वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी (दि. 24) सुरू झालेल्या दमदार पावसात पावसाळी पर्यटनासाठी देशभरातील पर्यटकांनी सिंहगड किल्ल्यावर गर्दी केली होती. संततधार पावसामुळे दरडी, बुरुजाच्या दगड-माती घाट रस्त्यासह पायी मार्गावर ढासळू लागली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सायंकाळी सहा वाजता गडावर जाण्यास मनाई करण्यात आली. दिवसभरात गडावर वाहनाने जाणार्या पर्यटकांकडून जवळपास एक लाख रुपयांचा टोल वन विभागाने वसूल केला.
रिमझिम पावसाबरोबर अधूनमधून सरी कोसळत होत्या. दाट धुक्यात गडाचे बुरुज, तटबंदीसह सभोवतालच्या डोंगररांगा हरवून गेल्या होत्या. मक्याची कणसे, झुणका-भाकरीचा आस्वाद घेत चिंब भिजून पर्यटकांनी गडावर यंदाच्या मोसमातील पहिल्या पावसाचे स्वागत केले. यासह खडकवासला, पानशेत धरण परिसरातही पर्यटकांनी गर्दी केली होती. गडावरील वाहनतळ दुपारी 12 वाजेच्या सुमारास हाऊसफुल्ल झाला. त्यामुळे घाट रस्त्यावर दूर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या. कोंढणपूर फाट्यासह डोणजे-गोळेवाडी मार्गावर वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी सुरक्षारक्षकांची सायंकाळी उशिरापर्यंत धावपळ सुरू होती.
सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. मात्र, घाट रस्त्यावर दरड कोसळली नाही. किरकोळ दगड-माती वाहून आली. सायंकाळी सहा वाजता गडावर पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली.
– संदीप कोळी, वनरक्षक, किल्ले सिंहगड