येरवडा : सिद्धार्थनगर झोपडपट्टीवासीयांना लवकरच मिळणार हक्काचे घर

येरवडा : सिद्धार्थनगर झोपडपट्टीवासीयांना लवकरच मिळणार हक्काचे घर
Published on
Updated on

येरवडा; पुढारी वृत्तसेवा : नगर रोडवरील सिद्धार्थनगर (विमाननगर) येथील अनेक झोपडपट्टीवासीयांची घरे रस्ता रुंदीकरणासाठी हटविली आहेत. गेली 14 वर्षे इथली माणसे असुविधांचा सामना करत जंगली भागात राहात आहेत. त्यांना हक्काचे घर कधी मिळणार, असा प्रश्न आमदार सुनील टिंगरे यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बैठक बोलावली जाईल व झोपडपट्टीवासीयांचा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन दिले.

पुणे येथे 2009 मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू, व्हीआयपींच्या वाहनांसाठी विमानतळालगत असलेल्या सिद्धार्थनगर झोपडपट्टीतून जाणार्‍या व्हीआयपी रस्त्याचे रुंदीकरण केले होते. यात सुमारे 200 झोपड्या आणि 15 दुकाने बाधित झाली होती. तत्कालीन आयुक्त प्रवीणसिंग परदेशी यांनी झोपडपट्टीवासीयांशी चर्चा करून रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यावेळी परदेशी हे एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील होते.

त्यांनी बाधितांना एसआरए योजनेतून घरे आणि दुकाने उपलब्ध करून देण्याचे असे आश्वासन दिले होते. त्यानंतर झोपडपट्टीवासीयांनी घरे, दुकाने खाली करून रस्त्यासाठी जागा दिली होती. मात्र, गेल्या 14 वर्षे झाली झोपडपट्टीवासीय हक्काच्या घरासाठी लढत आहेत. तरीही त्यांना अद्याप प्रशासनाकडून पक्की घरे देण्यात आली नाहीत. त्यांना तातडीने पक्की घरे मिळाली पाहिजेत, अशी मागणी आमदार टिंगरे यांनी विधानसभेत केली.

या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, 'जर कोणी 14 वर्षे घरासाठी लढत असेल, तर त्यांना हक्काची घरे मिळाली पाहिजेत. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुणे महापालिका आयुक्त, एसआरएचे सीईओ यांची बैठक बोलावून हा प्रश्न सोडविला जाईल तसेच ज्याठिकाणी एसआरए योजना लागू करता येईल, त्याठिकाणी ती लागू करून झोपडपट्टी निर्मूलनासाठीदेखील प्रयत्न केले जातील.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news