अमृत भांडवलकर
सासवड: कर्हा नदीचे उगमस्थान असलेल्या पुरंदरच्या पश्चिमेकडे गराडे दरेवाडी (ता. पुरंदर) येथील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चतुर्मुख शंभू महादेवाच्या पुरातन मंदिरात श्रावणाची जय्यत तयारी झाली आहे. हे प्राचीन धार्मिक स्थळ असंख्य शिवभक्तांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
ऐतिहासिक कर्हा नदी व कर्हेची उपनदी चरणावतीचा उगम येथूनच होतो. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांवरून भाविक-भक्त येथील देवस्थान महात्म्यामुळे दर्शनासाठी येथे येतात. श्रावण महिन्यात चतुर्मुख महादेव मंदिर परिसर शिवभक्तांनी फुलून जातो. (Latest Pune News)
दिवसभर सुरक्षाव्यवस्था, दर्शनबारीची व्यवस्था, पाणी व पार्किंगची व्यवस्था येथे असणार आहे. या वेळी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. महिनाभर पुणे, पुरंदर, हवेली, भोर परिसरातील हजारो भाविक भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर खुले असणार आहे.
ब्रह्मदेवाचे सान्निध्य लाभलेल्या व तपश्चर्या केलेल्या कर्हा पठारावरील डोंगरास चतुर्मुख डोंगर किंवा ब्रह्मगिरी म्हणून ओळखले जाते. एक आख्यायिका सांगण्यात येते की, पांडव वनवासात असताना पाण्याच्या शोधात चतुर्मुख महादेव मंदिर परिसरात आले.
पाण्याचा शोध काही लागेना. शेवटी त्यांच्याद्वारे तेथील पाण्याचा कमंडलू लवंडण्यात आला. कमंडलूतील एक प्रवाह दरेवाडीमार्गे गराडे गावातून पांडेश्वरच्या पुढे जातो. त्या प्रवाहास कर्हा नदी म्हणतात व एक प्रवाह पठारवाडी, भिवरी, चांबळीमार्गे जातो त्यास चरणावती नदी किंवा चांबळी नदी असे म्हणतात. कर्हा व चांबळी नदीचा संगम सासवड येथील संगमेश्वर महादेव मंदिराजवळ होतो. या नदीच्या प्रवाहमार्गावर 74 शिवलिंगे आहेत.
चतुर्मुख महादेव मंदिर हे पुरातन मंदिर असून, मंदिराचा गाभारा हेमाडपंती आहे. नव्या-जुन्याची सांगड घालून मंदिराचा नव्यानेच जीर्णोद्धार झाला आहे. मंदिराचे स्थान डोंगर परिसरात असून, येथील परिसर नितान्त सुंदर असल्याने पर्यटकांचा ओघ वाढलेला आहे
मंदिरात कसे पोहचाल?
कात्रज-कोंढवा-सासवड रस्त्यावरून भिवरी गावाजवळील पठारवाडीमार्गे चतुर्मुख महादेव मंदिर.
खेड शिवापूरवरून गराडे गावाजवळील मरीआई घाटातून चतुर्मुख महादेव मंदिर.
सासवडवरून हिवरे, चांबळी, बोपगाव, भिवरीमार्गे चतुर्मुख मंदिर.
सासवडवरून कोडीत, गराडे, थापेवाडी, वारवडी, दरेवाडीमार्गे चतुर्मुख महादेव मंदिर.