Farmers benefit from brinjal crop
बावडा: वांगी हे वर्षभर कायम मागणी राहणारे पीक आहे. त्यामुळे या पिकापासून शेतकर्यांना आर्थिक आधार प्राप्त होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील शेतकरी आबासाहेब विठ्ठल माने यांनी एक एकर क्षेत्रावर वांगी पिकाचा मळा फुलविला आहे.
मागील एक महिन्यापासून त्यांच्या वांगी पिकाची तोडणी सुरू आहे. प्रारंभी त्यांच्या वांगी पिकास प्रति 40 ते 45 रुपये असा भाव मिळत आहे. आबासाहेब माने यांनी मे महिन्यात 1 एकर क्षेत्रावर वांग्याची लागवड केली. (Latest Pune News)
त्यानंतर आंतरमशागत, खते, पाणीव्यवस्थापन, औषधफवारणी वेळोवेळी केली. त्यामुळे पीक जोमदार आले असून, दिवसाआड वांगी तोडणी करून बाजार समितीकडे विक्रीसाठी पाठविली जात आहेत.
वांग्याच्या एक एकर क्षेत्रातून साधारणतः 50 ते 60 क्विंटल उत्पन्न अपेक्षित असून, एकूण 5 ते 7 लाखांचे उत्पन्न मिळेल, असा आशावाद आबासाहेब माने यांनी व्यक्त केला. वांगी पिकासाठी तोडणी व इतर कामांमध्ये त्यांना आई कस्तुराबाई, पत्नी रेखा, भावजय मोनल माने यांचे सहकार्य मिळत आहे.
आषाढ महिन्यामध्ये नागरिकांचा मांसाहार खाण्याकडे भर असतो. त्यामुळे आषाढ महिन्यात वांग्यास मागणी काही प्रमाणात कमी असल्याने भाव प्रति किलोस 70 रुपयांवरून 40 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. परंतु आता आषाढ महिना संपल्यामुळे वांग्याच्या दरात चांगली वाढ अपेक्षित आहे.
- बाळासाहेब माने, वांगी उत्पादक शेतकरी, लाखेवाडी.