कमी दाबाने पाणीपुरवठामने टंचाई; औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरातील चित्र

कमी दाबाने पाणीपुरवठामने टंचाई; औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरातील चित्र
Published on
Updated on

[author title="मोहसीन शेख" image="http://"][/author]

बाणेर : पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रशासनाने सध्या पाणीकपात सुरू केली नसली, तरी नागरिकांना मात्र कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण, सुतारवाडी भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. उन्हाळ्यामुळे कूपनलिकेचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे मोठ्या सोसायट्या व वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महापालिकेचे पाणी वापरावे लागत आहे. पालिकेत घेण्यात आलेल्या सूस, म्हाळुंगे या गावांनाही पालिकेला पाणीपुरवठा करावा लागतो. मात्र, पुरेसा पाणी मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी श्रीधर कामत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याची समस्या भेडसावत आहे. आमच्या सोसायटीला दररोज तीन ते चार टँकर पाणी विकत घ्यावे लागत आहे. बालेवाडी टँकरमुक्त कधी होणार? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे.

-अमेय जगताप, रहिवासी, परफेक्ट टेन सोसायटी

योग्य नियोजन करून आमची सोसायटी पाणीबचतीसाठी प्रयत्न करीत आहे. परंतु, महापालिकेकडून दिले जाणारे पाणी कमी पडत असल्याने वर्षाकाठी टँकरच्या पाण्यावर जवळपास 12 ते 13 लाख रुपयांचा खर्च होत आहे.

– यश चौधरी, रहिवासी, एलाईट एम्पायर, सोसायटी

बालेवाडी भागाला नेमके पाणी किती देण्यात येते, याचे मोजमाप महापालिकेकडे नाही. या भागात होत असलेली पाणीगळती रोखल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल. महापालिकेने नागरिकांना पुरेसे पाणी देणे अपेक्षित आहे.

– रमेश रोकडे, बालेवाडी वेल्फेअर असोसिएशन

पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय

बाणेर-बालेवाडी : परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने सोसायट्यांमधून टँकरची मागणी वाढली आहे. अनेक सोसायट्यांना टँकरच्या पाण्यावर लाखो रुपये खर्च करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बालेवाडीतील एका सोसायटीने 'पाणी नाही, तर मतदान नाही' अशी भूमिका घेतली होती. टँकरमुक्त बालेवाडी व चोवीस तास पाणी योजनेचा अद्याप नागरिकांना लाभ मिळत नसल्याचे बाणेर-बालेवाडीतील नागरिकांनी सांगितले.

औंध : बाणेर-औंध हद्दीवर असलेल्या सोसायट्यांमध्ये सध्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. यामध्ये दर्शनपार्क, स्नेहांकित सोसायटी परिसराचा समावेश असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

पाषाण-सुतारवाडी : या भागात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वारजे भागात असलेल्या पाण्याच्या टाकीतून अनेकवेळा कमी पाणी सोडण्यात येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. परंतु, नेमके कारण काय आहे? याचा विचार प्रशासनाने करणे गरजेचे आहे.

पाणीटंचाई दृष्टिक्षेपात

  • पाणीकपात नसतानाही पाणीपुरवठा मात्र कमी.
  • बाणेर-बालेवाडी परिसरात टँकरची मागणी वाढली.
  • कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी.
  • चोवीस तास पाणी योजनेचा लाभ मिळणार तरी कधी?

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news