पारगाव : शॉर्टसर्किटने 6 एकर ऊस जळाला

पारगाव : शॉर्टसर्किटने 6 एकर ऊस जळाला

पारगाव; पुढारी वृत्तसेवा: नागापूर येथील म्हस्केमळ्यात शॉर्टसर्किट होऊन सहा एकर ऊस जळाला. ही घटना शनिवारी (दि. 29) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये नितीन बाळासाहेब म्हस्के या शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले. नागापूर गावातील थापलिंग देवस्थानच्या पश्चिम दिशेला म्हस्केमळा आहे. तेथील शेतकरी नितीन बाळासाहेब म्हस्के यांचा सहा एकर ऊस आहे.

उसाच्या शेतावरून विजेच्या तारा गेल्या आहेत. शनिवारी सकाळी वीजपुरवठा खंडित होता. दुपारी वीजपुरवठा सुरू होताच खांबावर शॉर्टसर्किट झाले. त्याच्या ठिणग्या उसाच्या शेतात पडून आग लागली. घटनेची खबर मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांना कळताच त्यांनी तातडीने भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केले. तोपर्यंत संपूर्ण उसाला आग लागली. आगीत सहा एकर ऊस जळाला.

आग लागल्याचे समजताच वीजपुरवठा खंडित करण्यासाठी नागापूरचे उपसरपंच सुनील शिंदे यांनी रांजणी येथील वीज उपकेंद्रात या घटनेची माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना कोणी दाद दिली नाही. अखेर ते स्वत:च वीज उपकेंद्रात गेले. वीजपुरवठा लगेचच खंडित झाला असता तर नुकसान टळले असते, असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news