ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळे दुकाने पाण्यात; राजगुरुनगरमधील दुकानदारांचे नुकसान

ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळे दुकाने पाण्यात; राजगुरुनगरमधील दुकानदारांचे नुकसान

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : राजगुरुनगरला शुक्रवारी (दि. 9) दुपारी पंधरा मिनिटे जोराचा पाऊस झाला. पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. शहरातील अत्यंत गजबजलेल्या वाडा रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये पाणी गेल्याने अनेक व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या रस्त्याचे नुकतेच काँक्रिटीकरणाचे काम झाले आहे. मूळ डांबरी रस्त्यावर खोदाई न करता दोन ते अडीच फूट उंच रस्ता तयार करण्यात आला आहे. यामुळे उत्तर बाजूची घरे आणि दुकानाचे जोते खाली गेले आहेत. तुलनेने थोडाच पाऊस झाला तरी लगेचच जवळपास 50 मिळकतींभोवती पाण्याचे तळे साठले.

अनेकांना दुकानातील साहित्य वाचविताना धावपळ करावी लागली. ज्यांना शक्य झाले नाही त्यांचे नुकसान झाले. रस्ता मूळ स्तरावर झाला असता तर येथील मिळकतधारकांवर ही वेळ आली नसती. खर्चीक काम टाळून ठेकेदाराने मनमानी केली आणि त्याला बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी पाठीशी घातल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. काम सुरू असताना याबाबत दै. 'पुढारी'ने त्यावर वृत्त प्रसिद्ध केले होते.

रस्त्याचे काम होताना मूळ रस्त्याची खोदाई करून काम केले असते, तर आताच्या उंच रस्त्याची उंची कमी झाली असती. मात्र, ठेकेदाराच्या हितासाठी अधिकारीवर्गाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्ता उंच झाला आहे. मात्र, उत्तर बाजूचे सांडपाणी वाहून नेणारे बंदिस्त गटर करण्यात येणार आहे. पावसाळ्यात पाणी साठणार नाही अशी व्यवस्था करण्यात येईल, असे या रस्त्याच्या कामासाठी प्रयत्न करणारे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news