

मंचर : पुढारी वृत्तसेवा : बांधाचे गवत पेटविल्याने आग गोठ्यापर्यंत पोहोचून दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच शेतीची अवजारे, धान्य, पाईप व आंब्याची झाडेदेखील आगीत जळून खाक झाली. साल, बाभूळवाडी (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी (दि. 9) दुपारी ही घटना घडली. शेतकरी गुलाब देवराम कदम यांचा शेतात बैलांचा गोठा आहे. त्या नजीकच अज्ञात व्यक्तीने मंगळवारी दुपारी त्याच्या शेताच्या बांधाचे गवत पेटवले. या वेळी वारा जास्त असल्यामुळे आग कदम यांच्या गोठ्यापर्यंत पोहोचली. या वेळी त्या ठिकाणी कोणी नव्हते. त्यामुळे गोठ्याला आगीने पूर्णपणे वेढले. या आगीत गोठ्यातील 2 बैलांचा होरपळून मृत्यू झाला, तर शेतीची अवजारे, धान्य, पाईप व आंब्याची झाडेदेखील आगीत जळून खाक झाली.
या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. तहसीलदार संजय नागटिळक, घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांच्याशी संपर्क करून शासकीय मदत देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी विनंती केली. तसेच गुलाब कदम यांना 5 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. या वेळी नंदकुमार बोराडे, सागर गव्हाणे आदी शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा