पुणे : पुढारी वृत्तसेवा : संगणक अभियंता मुलाने शिक्षिका असलेल्या आईचा चाकूने भोसकून खून केला. त्यानंतर त्याने आईचा मृतदेह बाथरूममध्ये टाकून पळ काढला. ही घटना एनआयबीएम रोड कोंढवा येथील कुबेरा गार्डन सोसायटीत 24 ते 28 मे या कालावधीत घडली आहे. मृतदेह कुजल्यामुळे फ्लॅटमध्ये दुर्गंधी सुटली होती. लता आल्फ्रेड बेंझामिन (वय 73) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी मिलिंद आल्फ्रेड बेंझामिन (वय 43) याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत डॉर्थी मोजेस पनमोजेस (वय 49) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मिलिंद याला दारूचे व्यसन आहे. कोविडमध्ये नोकरी गेल्यापासून तो बेरोजगार आहे. मिलिंद हा फिर्यादींचा लहान भाऊ आहे. मिलिंद आणि त्याची आई लता आल्फ्रेड बेंझामिन हे दोघे कुबेरा गार्डन सोसायटीत एकत्र राहत होते. मिलिंद हा आईसोबत दारूच्या पैशासाठी सतत वाद करत असे. त्यातूनच त्याने चाकूने भोसकून लता आल्फ्रेड बेंझामिन यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह बाथरूममध्ये टाकून पळ काढला.
मिलिंद याने आईचा खून केल्यानंतर मृतदेह बाथरूममध्ये टाकून पळ काढला. त्याने दरवाजावर 'मॉम इन इनसाइड डोन्ट गो इन… कॉल द पोलिस' असे लिहिले होते. तसेच, पळून जाताना त्याने आईचा मोबाईल लंपास केल्याचे दिसून आले आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
आरोपी मुलाला दारूचे व्यसन आहे. पैशासाठी तो आईसोबत वाद करत होता. त्याने चाकूने वार करून आईचा खून केला आहे. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
– संतोष सोनावणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा
फिर्यादी, त्याची बहीण हे दोघे नियमित आईसोबत फोनद्वारे संपर्कात असत. आई त्यांना मिलिंद दारूसाठी वाद करत असल्याचे सांगत होती. 24 मे रोजी फिर्यादींचे आईसोबत बोलणे झाले होते. 26 मे रोजी फिर्यादींनी आईच्या मोबाईलवर मेसेज केला. मात्र, उत्तर आले नाही. फोन केला असता, तोही उचलला गेला नाही. त्यामुळे त्यांनी बहिणीला फोन करून माहिती दिली. आई शाळेच्या कामात व्यस्त असल्याचे वाटले. 28 मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सोसायटीतील लोकांनी आई राहत असलेल्या फ्लॅटमधून वास येत असल्याचे सांगितले. त्यानुसार फिर्यादींनी तेथे जाऊन पाहिले, तेव्हा दरवाजा बंद दिसला. प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. दरवाजा तोडून आत पाहिले तेव्हा आईचा मृतदेह बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.
हेही वाचा