धक्कादायक! शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याने तरुणीसोबत केलं असं काही

धक्कादायक! शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याने तरुणीसोबत केलं असं काही

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. दर्‍याबा साऊबा साळे (रा. विठ्ठलनगर, जत, जि. सांगली) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सप्टेंबर 2022 ते 8 मार्च 2024 या कालावधीत हडपसर, अंबरनाथ आणि जत परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी मूळची सांगलीतील आहे. ती कामानिमित्त मुंबईत स्थायिक झाली आहे.

आरोपी साळे आणि तरुणी ओळखीचे आहेत. साळेने तरुणीला जेवण करायला जाऊ, असे सांगून एका हॉटेलमध्ये नेेले. तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्याने तरुणीवर बलात्कार केला. तरुणीची छायाचित्रे त्याने मोबाईलवर काढली. त्यानंतर त्याने तरुणीला पुन्हा हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केला. त्याने तरुणीला विवाहाचे आमिष दाखविले. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ केली. तरुणीने संपर्क तोडल्यानंतर त्याने समाजमाध्यमात छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी तरुणीला दिली. त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. साळेविरुद्ध बलात्कार, धमकावणे, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिस निरीक्षक मंगल मोढवे तपास करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news