दहा वर्षांतील काम हा फक्त ट्रेलर : पंतप्रधान नरेंद्र मोदी

दहा वर्षांतील काम हा फक्त ट्रेलर : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दहा वर्षांतील आपले काम हा फक्त ट्रेलर आहे. अजून खूप काम करायचे आहे, असा सूचक इशारा देत यापूर्वीच्या सरकारने राजकीय स्वार्थाला प्राधान्य दिले. त्याची रेल्वे शिकार ठरली. त्यामुळे रेल्वेची अवस्था नरकासारखी झाली होती. त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी जी इच्छाशक्ती हवी होती, ती आपल्या सरकारने दाखवली, आता भारतीय रेल्वे आधुनिकतेकडे वेगाने जात आहे. तिच्या विकासाचा वेग थांबू देणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

अहमदाबाद येथे मंगळवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात देशभरातील पंधराशे स्थानकांवरील 'एक स्थानक, एक उत्पादन'अंतर्गत स्टॉल्सचे मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण झाले. कोल्हापूर स्थानकावरही हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमातच मोदी यांनी रेल्वेच्या सुमारे 85 हजार कोटींच्या विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजनही केले. महाराष्ट्र आणि गुजरातमधील एकता मॉलचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झाले. पूर्वेकडील सहा राज्यांच्या राजधान्या रेल्वेने जोडल्या नव्हत्या. 35 टक्केच विद्युतीकरण झाले होते. दुहेरीकरण ही तर यापूर्वीच्या सरकारची प्राथमिकताच नव्हती, असे सांगत मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यापूर्वीचे रेल्वेमंत्री रेल्वे बजेटमध्ये
केवळ या गाडीला हा स्टॉप दिला, या गाडीचे इतके डबे वाढवले, असेच सांगत होते. मात्र, आपल्या सरकारने रेल्वेच्या विकासाला सर्वोच्च प्राथमिकता दिली. रेल्वेचे स्वतंत्र बजेट बंद करून ते सरकारच्या बजेटमध्ये समाविष्ट केले. यामुळे आता सरकारचा पैसा रेल्वे विकासावर खर्च होत आहे. यापूर्वीच्या सरकारच्या तुलनेत रेल्वे बजेट तब्बल सहा पटीने वाढवले. कुणी कल्पनाही केली नसेल, असा रेल्वेचा कायापालट होत आहे. सर्वसामान्य व्यक्तीलाही विमानतळासारख्या सुविधा रेल्वेस्थानकांवर मिळत आहेत.

भारतीय रेल्वे म्हणजे समस्या, रेल्वे कधीही सुधारणार नाही, असाच या देशातील लोकांचा समज झाला होता. माझ्या तर आयुष्याची सुरुवात रेल्वे रुळावरूनच झाली होती, त्यामुळे रेल्वे काय आहे हे मलाही माहीत होते, असे सांगत मोदी म्हणाले, आता रेल्वेचा चेहरा बदलत आहे. यावर्षीच्या अवघ्या 75 दिवसांत 11 लाख कोटींपेक्षा जादा निधीच्या योजनांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले आहे. हा देश कसा पाहिजे, हे ठरवण्याचा हक्क तरुणांचा आहे. आज जे लोकार्पण केले ते त्यांच्या चांगल्या वर्तमानासाठी आहे. ज्याचे भूमिपूजन झाले, ते त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. यापूर्वीच्या पिढ्यांनी जे भोगले ते या पिढीला आणि त्यांच्या मुलांना बघू देणार नाही, असेही मोदी यांनी सांगितले.

केवळ नव्या रेल्वे, स्थानके, मार्ग बनत नसून, 'मेड इन इंडिया'ची इको-सिस्टीम बनत चालली आहे, ते सांगत मोदी म्हणाले, रेल्वे 'आत्मनिर्भर भारता'चे नवे माध्यम बनत 'एक स्थानक, एक उत्पादन'मुळे स्थानिक उत्पादनांची विक्री होणार आहे. त्यातून संस्कृती, वारसा आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. सरकार जी विकासाची कामे करत आहे, ते सरकार बनवण्यासाठी नाही, तर विकसित भारत घडवण्यासाठीचे मिशन असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.

कोल्हापूर स्थानकावर झालेल्या कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापूर-मुंबई मार्गावर पुढील टप्प्यात 'वंदे भारत' सुरू होईल. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यावेळी भाजपचे समरजित घाटगे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, रूपाराणी निकम, संजय सावंत, अजित कामत, विजयसिंह खाडे, किरण नकाते, डॉ. सदानंद राजवर्धन आदी उपस्थित होते.

यावेळी रेल्वेच्या गतिशक्ती विभागाचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक प्रकाश उपाध्याय, विभागीय यांत्रिक अभियंता (ऑपरेशन) दीपक खोत, कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक सुनेत्रा राणे, वाणिज्य विभागाच्या मनीषा प्रभुणे, रेल्वेचे स्टेशन व्यवस्थापक राजन मेहता, सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, जयेश ओसवाल, मोहन शेट्टी, सदाशिव सातपुते उपस्थित होते. मुख्य कार्यालयीन अधीक्षक अनिल कदम यांनी सूत्रसंचालन केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news