Pune Railways: रेल्वेच्या पुणे विभागातही मरण‘यात्रा’!

पुणे विभागातील अपघातांची आकडेवारी पाहिली असता धक्कादायक वास्तव समोर
Pune Railways
रेल्वेच्या पुणे विभागातही मरण‘यात्रा’!Pudhari File Photo
Published on
Updated on

पुणे: मुंबईतील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी (दि. 9) चार प्रवाशांचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची आणि नऊ जण गंभीर जखमी झाल्याची भीषण घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या पुणे विभागातील अपघातांची आकडेवारी पाहिली असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

जानेवारी 2024 ते मे 2025 या सतरा महिन्यांच्या कालावधीत पुणे विभागात रेल्वे अपघातात तब्बल 49 जणांचा बळी गेला, तर 109 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे पुणे विभागही रेल्वेप्रवासी आपली मरणयात्राच करीत आहेत, हे वास्तव आहे. (Latest Pune News)

Pune Railways
Pune Politics: महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली

सन 2024 या संपूर्ण वर्षात 107 जण रेल्वेतून पडले होते, त्यापैकी 35 जणांनी जीव गमावला आणि 72 जण जखमी झाले. विशेष म्हणजे, 2025 च्या पहिल्या पाच महिन्यांतच 51 जण रेल्वेतून पडून अपघातग्रस्त झाले, यात 14 जणांचा मृत्यू झाला आणि 37 जण जखमी झाले. याचा अर्थ अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी ती चिंताजनकरीत्या कायम असल्याचे दिसते.

मुंबई लोकलचा धडा पुणेकरांनाही!

मुंबई लोकलमध्ये घडलेल्या अपघातांची पुनरावृत्ती पुणे विभागातही होत आहे. गर्दीच्या वेळी दरवाजातउभे राहणे, धावत्या रेल्वेत चढण्याचा किंवा उतरण्याचा धोकादायक प्रयत्न करणे, यामुळेच जीवघेणे अपघात घडत आहेत.

प्रवाशांनी, विशेषतः युवकांनी आपल्या सुरक्षिततेची गंभीर दखल घेणे आणि रेल्वे प्रवासाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या एका क्षणाच्या चुकीमुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

रेल्वेकडून पाच लाखांची मदत

रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत मृतांच्या कुटुंबीयांना केली जाते. त्यात जखमींना दीड ते दोन लाखांपर्यंत मदत केली जाते. याशिवाय तिकीट काढताना अधिकचे पैसे देऊन इन्शुरन्स काढला, तर त्या इन्शुरन्सद्वारे मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत केली जाते. ही 10 लाखांची मदत आणि त्याकरिता आवश्यक इन्शुरन्स प्रक्रिया आयआरसीटीसीकडून काढण्यात येतो, असे रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा यांनी सांगितले.

Pune Railways
Pune Politics: महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. रेल्वे स्थानकांवर आणि डब्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात आहे. तसेच, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांकडून फलाटांवर आणि धोकादायक ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे; जेणेकरून बेजबाबदार वर्तन करणार्‍यांवर कारवाई करता येईल. प्रवाशांनीही स्वतःच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणे सर्वांत महत्त्वाचे आहे. धावत्या रेल्वेतून चढणे-उतरणे, रूळ ओलांडणे किंवा दरवाजात उभे राहणे हे जीवघेणे ठरू शकते. आम्ही वेळोवेळी आवाहन करीत असतो की, प्रवाशांनी संयम राखावा आणि सुरक्षितपणे प्रवास करावा.

- हेमंतकुमार बेहरा, विभागीय वाणिज्य अधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग

पुणे विभागातील रेल्वे प्रवासाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने आणि अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. रेल्वेची रोज अडीच करोड आरक्षित आणि तत्काळ तिकिटे खपतात. त्या प्रत्येक तिकिटामागे विम्यासाठी आकारणी केली जाते. प्रचंड पैसा कंपनीला मिळतो. मात्र, मदत फक्त 10 लाखांचीच, हे बरोबर नाही. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना विमा योजनेद्वारे रेल्वेने 50 लाखांची मदत करावी, तर जखमींना 30 लाखांची मदत करावी. याशिवाय रेल्वेकडून देण्यात येणारी लाखांची मदत रेल्वेकडून अनेकदा डावलली जाते. तीही प्रवाशांच्या कुटुंबीयांना मिळावी. त्यात रेल्वेने काळानुसार वाढ करावी.

- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

मुंबईला लोकल अपघाताची झालेली घटना दुर्दैवी आहे. अशा घटना पुणे विभागातही घडत आहेत, ही माहिती समजल्यावर धक्काच बसला आहे. रेल्वेतून पडून 49 जणांचा पुणे विभागात मृत्यू झाला, ही देखील तितकीच दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे पुणे रेल्वे प्रशासनानेही याकडे गांभीर्याने पाहत तत्काळ ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत.

- आनंद सप्तर्षी, सदस्य, प्रादेशिक सल्लागार समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news