धक्कादायक ! अल्पवयीन असल्यापासून युवतीचे शोषण; वडिलांच्या वयाच्या आरोपीचे कृत्य

धक्कादायक ! अल्पवयीन असल्यापासून युवतीचे शोषण; वडिलांच्या वयाच्या आरोपीचे कृत्य
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा : वयाच्या 15 व्या वर्षापासून एका युवतीला लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागले. तिचा विवाह झाल्यानंतरही तिला भेटायला बोलावून जबरदस्तीने देशासह नेपाळमध्ये फिरवत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. अखेर तिला दौंड रेल्वे स्थानकावर सोडून आरोपीने पोबारा केला. संतोष गणपत भापकर (रा. पाटस रोड, बारामती) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात विनयभंग, बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका 20 वर्षीय महिलेने फिर्याद दिली.

सन 2019 पासून तिच्यासोबत हा प्रकार घडला. ती बारामतीतील पाटस रस्ता येथे आजीकडे राहण्यास असताना भापकर याच्या किराणा दुकानाकडे तिचे येणे-जाणे होते. तो शेजारीच राहण्यास असल्याने ती त्याला काका म्हणत असे. 2019 मध्ये शाळेला सुटी लागल्यानंतर ती त्याच्या दुकानात मदतीसाठी थांबली असताना पहिल्यांदा त्याने तिला दुकानाच्या आतील खोलीत नेत तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या आईला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी त्याने दिली होती. त्या वेळी त्याने मोबाईलमध्ये शरीरसंबंधाचे चित्रीकरण केले. ते व्हायरल करेन अशी धमकी देत तो 2019 पासून ते 2024 पर्यंत तिच्याशी पाटस रोड येथील दुकानाच्या शेडमध्ये, बर्‍हाणपूर येथे

त्याच्या गोठ्यातील खोलीत सातत्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत  होता. तिने नकार दिला की फोटो व व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी तो देत होता. डिसेंबर 2023 मध्ये पीडितेचे लग्न जमले. सुपारी फुटली. त्यावेळी भापकर याने तिला फोन करत तुझे लग्न झाले तरी मी बोलावेल तेव्हा यावे लागेल; अन्यथा मी लग्न मोडेल अशी धमकी दिली. त्यामुळे भीतीपोटी ती तो बोलावेल तेव्हा जात राहिली.  फेब्रुवारी 2024 मध्ये तिचे लग्न झाले. लग्नात भापकर हाही माझीच मुलगी आहे, असे सांगत विवाहकार्यात वावरत होता. लग्नानंतर पीडिता सासरी नांदण्यासाठी गेली असताना 29 फेब्रुवारी रोजी त्याने तिला फोन केला. मला तुला शेवटचे भेटायचे आहे, तुझे सगळे रेकॉर्डींग डिलिट करतो. फक्त सासरमधून निघून येताना पतीच्या मारहाणीमुळे घर सोडत आहे, अशी चिठ्ठी लिहून बाहेर पड असे सांगितले.

त्यानुसार पीडिता दि. 1 मार्च रोजी बाहेर पडली. माळेगाव येथून भापकर याने तिला त्याच्या मोटारीत बसवले. तेथून त्याने तिला बर्‍हाणपूर येथे नेले. पुढे टोलनाक्यावर ती दिसू नये, यासाठी तिला गाडीच्या डिक्कीत बसवून वरवंडला नेले. रात्री पुन्हा बारामतीत आणले. तेथे मोटार लावून त्याने बसने तिला भिगवण व तेथून पुणे गाठले. पुण्यातून त्याने बसने तिला नाशिकला व तेथून रेल्वेने दिल्लीला नेले. दिल्लीत त्याने तिच्याशी लॉजवर शरीरसंबंध ठेवले. दिल्लीतून 4 मार्च रोजी त्याने तिला रेल्वेने हैद्राबादला, तेथून तिरुपती बालाजी येथे नेत शरीरसंबध केले. 6 मार्च रोजी तिरुपतीहून त्याने रेल्वेने तिला कोल्हापूर-प्रयागराज, चित्रकुट-गोरखपूर व तेथून थेट नेपाळला पशुपतीनाथ मंदिर असे दहा

दिवस फिरवले. दि. 17 मार्च रोजी त्याने अयोध्येला तिला नेले. तिने माझे फोटो, व्हिडीओ डिलिट कधी करणार अशी विचारणा केली असता त्याने पुन्हा जबरदस्ती केली. त्यानंतर त्याने रेल्वेने काशी, बौद्ध गया येथे नेले. दि. 20 मार्च रोजी तो बौद्धगया येथून तिला घेऊन दौंड रेल्वे स्टेशन येथे आला. घडलेली घटना कोणाला सांगू नको, नाही तर जिवंत ठेवणार नाही असे सांगत त्याने तिला बारामतीला जायला सांगितले. पीडितेने काही सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेत दौंडवरून बारामती गाठली. त्यानंतर तिने शहर पोलिसांत त्याच्याविरोधात फिर्याद दिली. भापकर हा अद्याप फरार आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news