धुळीने माखला शनिवारवाडा; पर्यटकांच्या पदरी निराशा | पुढारी

धुळीने माखला शनिवारवाडा; पर्यटकांच्या पदरी निराशा

नितीन पवार

कसबा पेठ : पुणे महापालिकेकडून सुमारे 40 कोटी रुपये खर्चा अंतर्गत शनिवारवाडा परिसरातील व्यासपीठ व खुल्या पटांगणात नूतनीकरणाचे काम सुरू आहे. बाजीराव पेशव्यांची वंशवेल, पेशव्यांबद्दल गौरवोद्गार, पेशव्यांचे हस्ताक्षर, पुणेरी पगडी, पेशव्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग दगडी कोरीव कामातून बाजीराव पेशवे पुतळ्याजवळील भिंतीवर रेखाटण्यात आले आहे. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे हे फलक अस्पष्ट झाले असून, पटांगणातील दगडी पायर्‍या धूळखात पडून आहेत. अस्पष्ट व धुळीने माखलेला हा परिसर बघून पर्यटकांच्या पदरी निराशाच पडत आहे.

शनिवारवाडा पटांगणातील फरश्यांचे व्यासपीठ काढून नवीन काळ्या व लाल दगडांनी व्यासपीठ उभारण्याचे काम महिन्याभरापासून सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या कष्टाच्या आणि घामाच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शनिवारवाडा पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येतात. येथील वास्तू पाहून त्यांच्या मनात इतिहासाविषयी उत्सुकता वाढते. साहजिकच शनिवारवाडा पटांगणात बाजीराव पेशव्यांबद्दल गौरवोद्गार, पेशव्यांची वंशवेल, पुणेर पगडी, बाजीराव पेशव्यांच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत लढलेल्या 40 युद्धांमध्ये ते अपराजित राहिले त्यातील काही महत्त्वाचे प्रसंग दगडी कोरीव कामातून रेखाटण्यात आले. मात्र, पालिका प्रशासनाकडून कोणतीही काळजी घेण्यात न आल्याने गेल्या दोन वर्षांपासून हे माहिती फलक अस्पष्ट झाले आहेत.

पटांगणात पर्यटकांना बसण्यासाठी बांधण्यात आलेल्या दगडी पायर्‍या धूळखात आहेत. पटांगणातील हिरवळीला पाणी न मिळाल्याने मुंग्यांची वारुळे तयार झाली आहेत. पार्किंगसाठी सुरक्षारक्षक नसल्याने पर्यटकांऐवजी परिसरातील नागरिकांच्या गाड्या दिवसभर बेकायदेशीरपणे पार्क केल्या जातात. पेशवे पुतळा परिसरात स्वच्छतेअभावी दुर्गंधी पसरली आहे. दिशादर्शक फलक नसल्याने पर्यटकांच्या पदरी निराशाच पडत आहे.

सुशोभीकरण की उधळपट्टी?

शनिवारवाडा पटांगणात जुने चांगल्या फरशीचे व्यासपीठ उखडून काळ्या- लाल दगडात व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे देशी-विदेशी पर्यटकांना सुशोभीकरण सुरू आहे की उधळपट्टी, हा प्रश्न पडत आहे.

शनिवारवाडा संवर्धनासाठी अनेक वर्षांपासून केंद्र व पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा करीत आहोत. पालिकेकडून बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचे पूर्वीच्या संगमरवरी टाईल्स काढून त्याजागी दगडी ब्लॉकमध्ये बांधकाम करण्यात आले. पेशव्यांचे हस्ताक्षर, वंशवेल, पुणेरी पगडी, पेशव्यांबद्दल गौरवोद्गार, दगडी कामातील फलक अस्पष्ट झाले असून, ते धूळखात पडून आहेत. पालिकेने येथील कामे अर्धवट सोडून दिली आहेत.

– कुंदन कुमार साठे सचिव, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान.

शनिवारवाडा येथील व्यासपीठाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. एकूण 40 कोटी रुपये खर्चापोटी हे काम सुरू आहे. शनिवारवाडा व्यासपीठाच्या फरशा तुटल्या होत्या, त्यामुळे नवीन फरशांऐवजी दगडी ब्लॉक बसविणे सुरू आहे.

– सुनील मोहिते, प्रभारी कार्यकारी अभियंता, पुणे महानगरपालिका.

हेही वाचा

Back to top button