शिरूरची शेतमालाची बाजारपेठ आता संपण्याच्या मार्गावर

शिरूरची शेतमालाची बाजारपेठ आता संपण्याच्या मार्गावर
Published on
Updated on

शिरूर; पुढारी वृत्तसेवा : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल विक्री बाजार वेळेसंदर्भातला वाद विकोपाला गेला आहे. समितीच्या हट्टापायी बाजारपेठ मोडकळीस येण्याची भीती निर्माण झाली आहे. पारनेरचे आमदार नीलेश लंके हे शेतमाल विक्रीसाठी बेलवंडी फाटा (ता. श्रीगोंदा) येथे पुणे- नगर रस्त्याच्या कडेला सुमारे दोन एकर जागा उपलब्ध करून देणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून हा वाद सुरू आहे. सकाळी की संध्याकाळी बाजार या वादात अनेक बैठका झाल्या. त्यानंतर सोमवारी (दि 21) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. बाजार समितीने सकाळीच बाजार भरणार असे जाहीर केल्याने शेतकर्‍यांनी आक्रमक होत आम्ही संध्याकाळी बाजार भरवणार, अशी भूमिका घेतली. मंगळवारी (दि.22) सायंकाळी बाजार समितीने तीनही गेट बंद केल्याने शेतकर्‍यांनी बाजार आवाराबाहेर बाजार सुरू केला.

सोमवारच्या बैठकीत श्रीगोंदा व पारनेरच्या शेतकर्‍यांबाबत काही जणांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नाराज झालेल्या शेतकर्‍यांन पारनेरचे आमदार नीलेश लंके यांची भेट घेत त्यांची व्यथा मांडली. मंगळवारी (दि. 22) लंके यांनी रात्री 8:30 च्या दरम्यान शिरूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकर्‍यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच पुढील चार दिवसात श्रीगोंदा, पारनेर तसेच शिरूरच्या शेतकर्‍यांसाठी बेलवंडी फाटा (ता. श्रीगोंदा) येथे पुणे- नगर रस्त्याच्या कडेला सुमारे दोन एकर जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून बाजार समितीचे पदाधिकारी आणि शेतकरी यांच्यात संघर्ष सुरू असून दोन वेळा बैठक होऊनही कोणताच ठोस निर्णय झाला नाही. शिरूर तालुक्यात प्रत्येक पक्षाचे ढीगभर नेते आणि डझनभर सामाजिक कार्यकर्ते असताना ऐन थंडीच्या दिवसात शेतकर्‍यांसाठी पहाटे बाजार भरविण्यात येईल या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निर्णयाला कुणीही विरोध केला नाही.

त्यामुळे 'सारा गाव मामाचा, पण एक नाय कामाचा' या म्हणीचा प्रत्यय शेतकर्‍यांना आला. सत्ताधारी अथवा विरोधक यांनी काही ठरावीक 'मूठभर' लोकांसाठी शेतकर्‍यांना अक्षरशः वार्‍यावर सोडल्याचे चित्र पहायला मिळाले. श्रीगोंदा आणि पारनेरच्या शेतकर्‍यांसाठी आमदार नीलेश लंके यांनी मात्र एक ठोस भूमिका घेत त्यांना जागा उपलब्ध करून दिल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

काही ठरावीक व्यापार्‍यांना त्रास होतोय यासाठी बाजार समितीने हा निर्णय घेतला असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. इथला शेतमाल दुसरीकडे गेला तर इथली शेतीमालाची बाजारपेठ पूर्णपणे कोलमडून जाणार आहे. भविष्याचा विचार करून बाजार समितीने सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे, अन्यथा ही बाजार समिती फक्त व्यापार्‍यांची राहील, हे मात्र तेवढेच खरे.

अजित पवार बोलणार
या संघर्षानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी शेतकरी कृती समितीचे नाथा पाचर्णे यांचे बोलणे होऊन दूरध्वनीवर माहिती घेत आपण सभापतींशी बोलतो, असे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याचे नाथा पाचर्णे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news