शिरूर: शिरूर नगरपरिषदेच्या प्रशासक काळातील मनमानी आणि गैरप्रकाराविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी (दि. 17) घंटानाद आंदोलन करण्यात आले. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव संताप व्यक्त केला.
या आंदोलनात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, अशोक पवार, अबिद शेख, संतोष थेऊरकर, हाफिज बागवान, राहील शेख, कलीम सय्यद, युवराज सोनार, महिला आघाडीच्या गीताराणी आढाव, राणी कर्डलेि, कृष्णा घावटे, सुरेश पाचर्णे, ॲड. रवींद्र खांडरे, चेतन साठे, विशाल जोगदंड, आदित्य उबाळे, आजीम सय्यद, योगेश पवार, विराज आढाव, योगेश जामदार, अक्षय सोनवणे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. नगरपरिषद गेल्या चार वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असून, मुख्याधिकारी एकहाती कारभार चालवत आहेत. (Latest Pune News)
निवडणुका न झाल्याने नगराध्यक्ष व नगरसेवक कार्यरत नाहीत आणि त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी केला. हे आंदोलन जवळपास दोन तास चालले. अखेर प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ यांनी आंदोलकांना निवेदन स्वीकारून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
आंदोलकांनी केलेले आरोप
चिंचणी धरण ते शिरूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी 70 कोटी रुपये मंजूर असूनही काम पूर्ण झालेले नाही.
गरीब अतिक्रमणधारकांवर कारवाई होते; मात्र आरक्षित जागेवरील मोठ्या अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष केले जाते.
बांधलेल्या संरक्षकभिंत एका महिन्यातच पडझड झालेली आहे.
नगर अभियंता ठराविक ठेकेदारांनाच कामे देतात.
कोणाकडे दाद मागायची?
नगरपरिषदेच्या विभाग प्रमुखांना आंदोलनाची पूर्वकल्पना असूनही ते कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. अधिकारी कायम अनुपस्थित राहतात. त्यामुळे नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची, असा सवालही आंदोलकांनी उपस्थित केला.