भामा आसखेड: खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणालगतच्या एका अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. एका महिन्यात रिसॉर्टवर कारवाई करू असे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना सांगितले आहे. आता अधिकारी त्या रिसॉर्टवर कारवाई करणार का? हे पहावे लागणार आहे.
भामा आसखेड धरणालगत वाकीतर्फे वाडा गावच्या हद्दीतील गट क्रमांक 59, 61 व 62 या क्षेत्राच्या जमिनीवर आणि धरणाचे जलाशयालगत पक्के बांधकाम असलेले रिसॉर्ट उभारले आहे, त्यावरच महसूलमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. (Latest Pune News)
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे या रिसॉर्टबाबत कोणतीही अर्जित किंवा मंजुरी नाही. तसेच वाकी तर्फे वाडा येथील या रिसॉर्टची पीएमआरडीएच्या ई-चलन प्रणालीमध्येही कोणतीही नोंद उपलब्ध नाही. त्यामुळे हे बांधकाम अनधिकृत असल्याचे बोलले जाते.
या गंभीर प्रकाराची दखल घेत आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले होते. खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू शेलार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर उच्चस्तरीय बैठक 10 सप्टेंबर रोजी मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली होती.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आमदार सुरेश धस, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, पीएमआरडीएचे सह आयुक्त (अतिरिक्त प्रभार) डॉ. दीप्ती सुर्यवंशी-पाटील, खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, जलसंपदा विभागाचे उपअभियंता, सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू शेलार उपस्थित होते.
या बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीएमआरडीए सहआयुक्त सुर्यवंशी यांना कारवाई कधी करणार? असे विचारले. त्यावर सूर्यवंशी यांनी, संबंधित अनधिकृत रिसॉर्टवर एका महिन्याच्या आत कारवाई होईल, असे स्पष्ट केले. याबाबत खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी माहिती दिली.