

बापू जाधव
निमोणे: ‘सोनं मोडावं; पण सोयरा घडवावा’ ही म्हण आजच्या काळात इतिहासजमा होताना दिसत आहे. भारतीय कायद्यानुसार मुला-मुलींना आई-वडिलांच्या मालमत्तेत समान अधिकार मिळाले आहेत, हे स्वागतार्ह असले तरी, या हक्काच्या आड लपून कर्तव्याला तिलांजली देण्याची नवी प्रवृत्ती समाजात बळावत आहे. मालमत्तेच्या हव्यासापोटी रक्ताची नाती आज कोर्टाच्या पायऱ्या झिजवत असून, भावनिक भिंती कोसळत असल्याचे विदारक चित्र शिरूर तालुक्यासह अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
शिरूर तालुक्यातील ‘श्यामराव’ (नाव बदलले आहे) हे या प्रवृत्तीचे एक जिवंत उदाहरण. आयुष्यभर काम न करता दारू, जुगार आणि फुकटच्या राजकारणात वेळ घालवणाऱ्या श्यामरावने स्वतःची वडिलोपार्जित कोरडवाहू जमीन कर्जाच्या ओझ्यात दाबली. मात्र, स्वतःची परिस्थिती हलाखीची असतानाही इतरांच्या मालमत्तेवर डल्ला मारण्याची त्याची वृत्ती कमी झालेली नाही.
जेव्हा त्याचे मामा थकले आणि त्यांच्या मुलांनी श्यामरावच्या आईला (त्यांच्या आत्याला) हक्कसोडपत्रासाठी विनंती केली, तेव्हा श्यामरावने आडमुठी भूमिका घेतली. जुन्या परंपरेनुसार ’चोळी-बांगडी’ करून नाते जपण्याऐवजी त्याने आईला पुढे करून चक्क कोर्टात दावा ठोकला. इतकेच नव्हे तर, त्याने बायकोच्या माहेरच्या मालमत्तेवर आणि सुनेच्या नावावरही विविध ठिकाणी दावे दाखल करून ‘वतनदारी’ मिरविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
आज अनेक ठिकाणी जमिनीचे तुकडे पडत चालले आहेत. 2-5 एकर जमिनीत अनेक वाटेकरी निर्माण होत असताना, माहेरपण जपण्यापेक्षा कोर्टाची पायरी चढणे अनेकांना जवळचे वाटू लागले आहे. सासरच्या वृद्ध सासू-सासऱ्यांची सेवा करणे, त्यांच्या आजारपणात पाठीशी उभे राहणे, या गोष्टींना फाटा देऊन थेट मालमत्तेत हिस्सा मागण्याची ही प्रवृत्ती कौटुंबिक स्वास्थ्य बिघडवत आहे.
एक गंभीर सामाजिक प्रश्न
ज्या घरांमध्ये सोयरीक करतानाच मुलीच्या बापाच्या जमिनीवर डोळा ठेवला जातो, तिथे ती मुलगी भविष्यात सुखी राहील का? दुसऱ्याच्या कष्टावर स्वतःचे शौक पूर्ण करण्यासाठी नात्यांच्या छाताडावर पाय देणारी ही माणसे समाजाला कोणत्या दिशेला नेत आहेत? कायद्याने दिलेला अधिकार हा सुरक्षेसाठी असावा, तो नाती संपविण्यासाठीचे शस्त्र ठरू नये, हीच आजच्या काळाची गरज असून, आता हा एक सामाजिक प्रश्न बनला आहे.