पुणे : शिंदे सरकार निर्णयांची अंमलबजावणीही करते : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे प्रतिपादन

पुणे : शिंदे सरकार निर्णयांची अंमलबजावणीही करते : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे प्रतिपादन
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'अडीच वर्षांत जी कामे झाली नाहीत, ती केवळ पाच महिन्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने केली आहेत. सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून, त्याची अंमलबजावणी देखील सरकार करत आहे,' असे प्रतिपादन खासदार
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. पुणे येथे बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ. शिंदे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रतोद भरत गोगावले, नरेश म्हस्के, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, शहराध्यक्ष नाना भानगिरे, किरण साळी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अडीच वर्षांत सर्वसामान्यांना सरकार आपले वाटत नव्हते, आमदार, खासदार आणि पक्षाकडून निवडणूक लढविणार्‍यांसाठी वेळ दिली जात नव्हती. परंतु गेल्या पाच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यापासून ते सर्वांना आपले वाटत आहे. अडीच वर्षे सर्वांसाठी दार बंद होते, ते आता सर्वांसाठी खुले आहे. आज कोणीही कधीही मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊ शकतात. त्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडू शकतात, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

अडीच वर्षे आमदार, खासदार, मंत्र्यांची खंत होती म्हणून आज हे पाऊल उचलले. शेतकर्‍यांसाठी जी मदत देण्यात आली, ती कोणतीही अट न घालता देण्यात आली. आज उठले की खंजीर, खोके, गद्दार एवढेच वाक्य बोलतात. त्यांच्याकडे दुसरे विषयच नाहीत, यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हे खोके कोणाकडे यायचे, कोण मोजायचे हे महाराष्ट्राला माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी कधीही या टीकेला उत्तर दिले नाही, ते आपल्या कामातून उत्तर देत आहेत, असा टोलाही शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. आढळराव पाटील, गोगावले आणि भानगिरे यांनी मनोगत व्यक्त केले.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभर विविध संघटना आणि विरोधी पक्षाकडून राज्यपाल यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. त्यात राज्यपाल हटाव अशी मागणी केली जात आहे. त्यावर 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी राज्यपाल हे आत्ता जाण्याच्या तयारीत आहेत. थोड्याच दिवसांत ते जातील. त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ,' असे म्हटले आहे.

'ज्यांना इतिहास माहीत नाही, त्यांनी बोलू नये'
ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहिती नाही, अशा लोकांनी विधाने करू नयेत. कोणीही असो, कोणत्याही पक्षाचे असो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत जर चुकीची वक्तव्ये केली जात असतील तर कोणालाही ते मान्य होणार नाही. प्रत्येकाने तारतम्य ओळखूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विधाने केली पाहिजेत, असे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी मत व्यक्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news