शेकरू, ब्लू मॉरमॉन शिरूरला अन् चित्ररथ बारामतीमध्ये !

शेकरू, ब्लू मॉरमॉन शिरूरला अन् चित्ररथ बारामतीमध्ये !

सुषमा नेहरकर-शिंदे : 

पुणे : शेकरू आणि ब्लू मॉरमॉन (फुलपाखराची एक जात) या दोन वन्यजीवांचा ठळक समावेश असलेला महाराष्ट्र राज्याचा जैवविविधता मानके चित्ररथ नैसर्गिक न्यायाने राज्यातील पहिला पर्यटन तालुका असलेल्या जुन्नर तालुक्याला संवर्धन आणि सादरीकरणासाठी मिळावा, अशी लेखी मागणी राज्य शासनाकडे खासदार, आमदार आणि स्वयंसेवी संस्थांनी केली होती. परंतु, हा चित्ररथ बारामतीला देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर असतानाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांचाच दबदबा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य सरकारच्या वतीने गतवर्षी (सन 2022) प्रजासत्ताकदिनी राजपथावर जैवविविधता मानके चित्ररथ सादर केला होता. या चित्ररथाला विशेष पारितोषिक देखील मिळाले होते. या चित्ररथाचे प्रमुख आकर्षण दुर्मीळ होत असलेले शेकरू आणि ब्लू मॉरमॉन हे दोन वन्यजीव होते. या दोन्ही वन्यजीवांचा अधिवास शिरूर लोकसभा मतदारसंघातील भीमाशंकर अभयारण्यात तसेच नाणे घाट परिसरात आढळून येतो. यामुळेच हा चित्ररथ पर्यटकांसाठी व संवर्धन करण्यासाठी या दोन्ही वन्यजीवांचा अधिवास असलेल्या तालुक्यांना मिळावा, अशी लेखी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व जुन्नर तालुक्यात निसर्गसंवर्धनाचे काम करणार्‍या सह्याद्री गिरिभ—मण संस्थेच्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली होती. त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा देखील सुरू होता. परंतु, शिंदे-फडणवीस सरकारने या चित्ररथाचे गिफ्ट विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बारामती तालुक्याला दिले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार, खासदार मूग गिळून
शेकरू व ब्लू मॉरमॉनचा काहीही संबंध नसलेल्या बारामती तालुक्यातील चिंकारा अभयारण्यात चित्ररथाचे अवशेष आणून ठेवले असल्याचे पुणे वन विभागातील सूत्रांनी सांगितले. परंतु, बारामतीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघावर सतत अन्याय होत असताना राष्ट्रवादीचे खासदार, आमदार मात्र मूग गिळून गप्प बसत असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे.

शेकरू आणि ब्लू मॉरमॉन या दोन्ही वन्यजीवांचा अधिवास भीमाशंकर आणि नाणे घाट परिसरात असल्याने हा चित्ररथ जुन्नर शहराला मिळावा, ही सर्वांत पहिली मागणी नोंदविली होती. आमच्या संकल्पनेतून या चित्ररथाचे संवर्धन आणि सादरीकरण जुन्नर नगरपालिकेच्या जिजामाता उद्यानात करण्याची आमची संकल्पना होती. मात्र, आता हा चित्ररथ बारामतीला देण्यात आल्याने आम्ही निराश झालो आहोत. हा चित्ररथ नैसर्गिक न्यायाने जुन्नरला मिळावा.
                             – संजय खत्री, अध्यक्ष, सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, जुन्नर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news