शिवनगर: माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते खा. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काका- पुतणे समोरासमोर एकमेकांना भिडणार आहेत.
गुरुवारी (दि. 12) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनेल आणि शरद पवार यांच्या बळीराजा शेतकरी बचाव पॅनेलने आपले उमेदवार जाहीर केले. यासह चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरू-शिष्यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनेलने देखील उमेदवार जाहीर केले. (Latest Pune News)
कष्टकरी शेतकरी समिती शुक्रवारी (दि. 13) आपले उमेदवार जाहीर करणार असल्याचे समजते. त्यामुळे माळेगाव कारखान्याची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार व खा. शरद पवार एकमेकांसमोर उभे ठाकले असून, तावरे गुरू-शिष्यांचा या दोघांशी सामना रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनेलने सत्ताधारी संचालकांपैकी 7 संचालकांना पुन्हा उमेदवारी दिली, तर उर्वरित 13 जागांवर नव्यांना संधी मिळाली आहे. अजित पवार यांनी स्वत:ची ‘ब’ वर्गातून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.
पुन्हा उमेदवारी मिळालेले विद्यमान संचालक
माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील तावरे, तानाजी तात्यासो कोकरे, योगेश धनसिंग जगताप, स्वप्निल शिवाजीराव जगताप, प्रताप जयसिंग आटोळे, नितीन सदाशिव सातव आणि संगीता बाळासाहेब कोकरे.
उमेदवारी न मिळालेले विद्यमान संचालक
विद्यमान अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, संजय वसंतराव काटे, सुरेश तुकाराम खलाटे, अनिल कृष्णराव तावरे, बन्सीलाल विलास आटोळे, राजेंद्र शंकरराव ढवाण, तानाजी नामदेव देवकाते, सागर अशोक जाधव आणि अलकाताई पोंदकुले.
अजित पवार यांच्याविरोधात शरद पवारांचा उमेदवार नाही
शरद पवार यांच्या पॅनेलने ‘ब’ वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात मात्र उमेदवार दिलेला नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.