पुणे: संस्थेत सुरू असलेल्या गोंधळाच्या टेन्शनमुळे ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’चे ज्येष्ठ सदस्य प्रेमकुमार द्विवेदी हे अचानक गंभीर आजारी पडले आहेत. मात्र, त्यांचे जवळचे मित्र अध्यक्ष दामोदर साहू यांनी आपल्या ओडिशा राज्यातील कटक या शहरात तत्काळ विमानाने जाणे पसंत केले. इतकी वर्षे साथ देणार्या जिवलग मित्राला अशा अवस्थेत दूर सारल्याने संस्थेत ‘दोस्त दोस्त ना रहा...’ चे सूर उमटत आहेत.
अध्यक्ष दामोदर साहू हे ओरिसाचे ते 80 वर्षांचे आहेत, तर ज्येष्ठ सदस्य प्रेमकुमार द्विवेदी यांचे वय 84 वर्षेआहे. हे दोघेच सध्या सर्वांत वरिष्ठ असून, दोघांशिवाय आजवर एकही बैठक झालेली नाही. मात्र मे आणि जून या दोन्ही सत्रांमध्ये द्विवेदी हे पुणे शहरात येऊन आजारीच पडले. त्यांच्यावर या वयात झालेले गंभीर आरोप हे एक त्यामागील प्रमुख कारण आहे. उत्तर प्रदेशातील जमिनीच्या व्यवहारात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. हे प्रकरण सध्या ऐरणीवर आहे. या सर्वांचा ताण आल्याने द्विवेदी हे प्रचंड विमनस्क होते, तरीही ते अध्यक्ष साहू या मित्राच्या आग्रहास्तव पुणे शहरात जूनच्या सत्राच्या बैठकीस आले. मात्र त्यांना पहिल्याच दिवशी अवस्थ वाटू लागल्यामुळे जोशी रुग्णालयात त्यांना दाखल करावे लागले. त्यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रियाही करण्यात आली असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दरम्यान दरम्यान प्रेमकुमार द्विवेदी यांच्या प्रकृतीची विचारणा करण्याबाबत शिवाजीनगर भागातील जोशी रुग्णालयात संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
दामोदर साहू यांचे जिगरी दोस्त असणारे संस्थेचे वरिष्ठ सदस्य प्रेमकुमार द्विवेदी हे जोशी इस्पितळात दाखल असून, त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रियेनंतरही त्यांची वयोमानानुसार प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. मात्र त्यांची काहीच दखल न घेता अध्यक्ष साहू ओडिशा राज्यातील त्यांच्या कटक शहरात निघून गेले आहे. त्यामुळे प्रेमकुमार द्विवेदी हे एकाकी पडले. त्यांच्यावर संस्थेची उत्तरप्रदेश अलाहाबाद शाखेची जमीन बेकायदा विकल्याचा आरोप आहे, हे प्रकरणसुद्धा धर्मादाय न्यायालयात दाखल आहे. ज्यावर 7 जुलै रोजी युक्तिवाद होणार आहे.
गेली अनेक वर्षे जिवलग मित्र असणारे हे सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीतील मित्र डावीकडून अध्यक्ष दामोदर साहू, तर उजवीकडे ज्येष्ठ सदस्य प्रेमकुमार द्विवेदी. हे छायाचित्र एप्रिल 2025 चे आहे. ते दोघे प्रचंड तणावातही शेरोशायरी आणि गप्पांत रमले होते.