पवारांच्या घरात वाद, कार्यकर्ते संभ्रमात

पवारांच्या घरात वाद, कार्यकर्ते संभ्रमात

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार कुटुंबीयांच्या घरगुती राजकीय वादाने पक्ष कार्यकर्त्यांचे मोठे हाल झाले आहेत. जिल्ह्यातील पक्षाच्या दहा आमदारांपैकी बहुतेक जण अजित पवार यांच्या पाठीशी आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील बंडखोरीच्या विरोधात भूमिका घेतल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांतील अस्वस्थता वाढली आहे. त्याचबरोबर पारंपरिक विरोधक सोबतीला आल्याने भाजपचे कार्यकर्त्यांतही चलबिचल आहे. पुणे जिल्हा ही शरद पवार यांची कर्मभूमी.

अजित पवारांनीही गेली तीन दशके याच जिल्ह्यात राजकीय वाटचालीचा श्रीगणेशा केला. जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन महापालिकांची सूत्रे गेली दोन दशके अजित पवारांच्या ताब्यात आहेत, तसेच पालकमंत्री म्हणूनही त्यांनी दहा वर्षे काम पाहिले. जिल्हा परिषद, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी त्यांच्यासमवेत आहेत. विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडीपासून प्रचारापर्यंत अजित पवारांचे लक्ष होते. त्यामुळे बहुतेक आमदार त्यांच्या पाठीशी उभे ठाकले.

शरद पवार यांचे निकटवर्तीय दिलीप वळसे-पाटील यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे तेही अजित पवार यांच्यासोबत गेले. राज्यातील सत्ताधारी गटाचे शहर जिल्ह्यात आता 21 पैकी अठरा आमदार झाल्याने, त्या मतदारसंघात विद्यमान आमदारांंविरुद्ध निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांना तर कालच्या घडामोडीमुळे काय भूमिका घ्यावी ते सुचेनासे झाले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना आता विधानसभेला संधी मिळणे दुरापास्त झाले आहे.

वेट अँड वॉचची भूमिका

पुणे जिल्ह्यात एकूण 21 आमदार असून, त्यापैकी दहाजण राष्ट्रवादीचे, आठजण भाजपचे, तर तिघे काँग्रेसचे आहेत. राज्यसभेतील पुण्याच्या खासदार वंदना चव्हाण, पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप शरद पवार यांच्यासोबत आहेत. अनेक कार्यकर्ते काल स्पष्टपणे बोलले नाहीत. येत्या दोन-तीन दिवसांत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. तोपर्यंत सध्याचे धूसर चित्र बऱयापैकी स्पष्ट होईल. तोपर्यंत वेट अँड वॉच ची भूमिका अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी सध्या घेतल्याचे दिसून येते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news