आम्ही शरद पवारांच्या पाठीशी ! राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षांची भूमिका

आम्ही शरद पवारांच्या पाठीशी ! राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षांची भूमिका

टीम पुढारी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षातून बंडखोरी करीत रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर दैनिक 'पुढारी'ने पुण्यातील राष्ट्रवादीच्या विविध विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. बहुतांश जणांनी आपण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले, तर काहींनी प्रतिक्रिया देण्यास नकार देत 'वेट अ‍ॅण्ड वॉच'ची भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे म्हणाले, 'कोणी कोठे जाऊ द्या; आम्ही मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहोत.'

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. नानासाहेब नलावडे म्हणाले, 'येत्या दोन दिवसांत मतदारसंघातील पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.' खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण म्हणाले, 'आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहोत. शरद पवार, अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे हे आमचे नेते आहेत.'

पर्वती विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष नांगरे म्हणाले, 'शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते आम्हा कार्यकर्त्यांना सारखेच आहेत. ' पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आनंद सवाणे म्हणाले, 'सध्याच्या राजकारणात घडत असलेल्या घडामोडींवर प्रतिक्रिया देण्याइतके आम्ही मोठे नाहीत.'

कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गणेश नलावडे म्हणाले, 'पक्षाचे आमदारही द्विधा मनस्थितीत आहेत. आम्ही छोटे कार्यकर्ते असून, पक्षाचे मोठे नेते यावर प्रतिक्रिया देऊ शकतील.' शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उदय महाले यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल बंद होता. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news