

Sharad Pawar
पुणे : ''पक्षात फूट पडली. आमच्या पक्षात फूट पडेल, असे कधीच वाटले नव्हते. काही लोक दुसऱ्या विचारसरणीने गेले. यामुळे पक्षातील फूट वाढली', अशी खंत राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मंगळवारी (दि.१० जून) व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे येथे आयोजित वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.
हा कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. तुमच्या सर्वांच्या कष्टामुळे, बांधिलकीमुळे हा पक्ष आहे. राष्ट्रवादीत सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली की तो कर्तृत्व दाखवतो. काही संकट आली तरी तुम्ही पक्ष पुढे नेण्याचे काम केले. मागील २६ वर्षे पक्ष पुढे नेण्याचे काम सामान्य कार्यकर्त्यांनी केले, असेही पवार म्हणाले.
पक्ष म्हणजे संघटना आहे. गेले ८ -१० वर्षे जयंतराव यांनी संघटनेचे काम प्रामाणिकपणे केले. जयंतराव यांनी माझ्याकडे सांगितले की नव्या पिढीला संधी द्या. सामुहिकपणाने या संदर्भातला निर्णय घेवू. हा निर्णय घेताना प्रत्येक तालुका, जिल्ह्यात नवे चेहरे दिसले पाहिजेत. माझी खात्री आहे, हजारो कार्यकर्ते पक्षात आहेत. त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेले नेतृत्व राष्ट्रवादी देवू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार असे दोन गट झाले. या राजकीय घडामोडीत मूळ राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे राहिली. त्यामुळे राष्ट्रवादीचे घड्याळ आणि पक्ष अजित पवार यांच्याकडे राहिले. तर राष्ट्रवादीचा दुसरा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्ष या नावाने आहे.
शरद पवार यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. जुले २०२३ मध्ये पक्षात मोठी फूट (NCP split) पडल्यानंतर शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे आपल्या समर्थकांसह शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सामील झाले.