

Sharad Pawar Group Meeting: राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत पक्षाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य घडामोडींवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
पुण्यातील एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीला शरद पवार गटातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, बाळासाहेब पाटील तसेच पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी बैठकीला हजेरी लावली.
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या राजकीय घडामोडींवर या बैठकीत सखोल चर्चा झाली. विशेषतः पक्षातील बदलते समीकरण, आगामी राजकीय रणनीती आणि संघटनात्मक बाबींवर नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी नुकतीच घेतलेली शरद पवारांची भेट हा देखील चर्चेचा महत्त्वाचा विषय असल्याची माहिती आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या चर्चेचा नेमका सूर काय होता किंवा कोणताही ठोस निर्णय झाला का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, पुढील काही दिवसांत यावरून मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.