पुणे: पुण्यात खड्ड्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यात पावसाळ्यात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होते. त्यामुळे पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पुणेकरांचा हा त्रास कमी करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला असून, पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत.
यासाठी 65 कोटी रुपयांच्या कामांना पालिकेच्या पूर्वगणन समितीने (इस्टिमेट कमिटी) मान्यता दिली असून, लवकरच या कामांना सुरुवात केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे पथविभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
महानगरपालिकेने रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. यात रिसरफेसिंगची कामे सुरू केली आहे. या रिसरफेसिंगच्या कामासाठी सुमारे पालिकेने 9 कोटी रुपये मंजुर केले आहेत.
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शहरातील क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर 2 कोटी 40 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तर रोड मेन्टेनन्स व्हेईकल (आरएमव्ही)च्या माध्यमातून रस्ते दुरुस्त केले जाणार आहेत.
यासाठीदेखील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकरिता 1 कोटी 10 लाख रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे (जेट पॅचर) बुजविण्यासाठी एकूण 5 कोटी रुपयांची, तर कोल्डमिक्स केमिकल काँक्रिटसाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे पावसकर म्हणाले.
सरकारने निविदा प्रसिद्ध करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. पालिकेमार्फत लवकरच या नव्या धोरणानुसार निविदा प्रक्रिया लवकर राबविली जाईल. 10 लाख ते दीड कोटी आणि दीड कोटी ते 25 कोटी रुपयांच्या कामांच्या निविदांची मुदत आठ दिवस असून, 25 ते शंभर कोटी रुपयांच्या कामाच्या निविदांची मुदत 15 दिवस केली आहे. शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक कामांसाठी 21 दिवसांची मुदत केली आहे. यामुळे यावर्षी निविदा प्रक्रियेचा कालावधी कमी होऊन कामे लवकर सुरू होतील.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग.