सुट्ट्यांमुळे शनिवारवाडा हाऊसफुल्ल; तीन दिवसांत साडेपंधरा हजार पर्यटकांची भेट
कसबा पेठ; पुढारी वृत्तसेवा: पाडवा, भाऊबीज दिवाळीच्या सणानंतर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शहरातील पर्यटनस्थळे शनिवारवाडा, पाताळेश्वर लेणी, आगाखान पॅलेस, पर्वती, नाना वाडा, तसेच दगडूशेठ हलवाई गणपती, कसबा गणपती, जोगेश्वरी मंदिरांसह शनिवारी (दि. 7) पर्यटकांनी गर्दी केल्याचे पाहावयास मिळालेे. विशेषत: गुरुवारपासून शनिवारपर्यंत म्हणजे तीन दिवसांत तब्बल 15,677 पर्यटकांनी शनिवारवाड्याला भेट दिल्याची माहिती शनिवारवाडा प्रशासनाकडून देण्यात आली.
दिवाळीची सुट्टी आणि जोडून आलेली गुरुवार, शनिवारची सुट्टी त्यामुळे शहरातील विविध पर्यटनस्थळे, तसेच मंदिरे, बागा गर्दीने फुलल्या होत्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती परिसरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. तसेच शनिवारवाडा पटांगण परिसरात अनेक पर्यटक सेल्फी विथ शनिवारवाडा सोबत फोटो काढण्यात, तसेच व्हिडिओ शूटिंग करण्यात गुंतलेले दिसून आले.
शनिवारवाडा पाहण्यासाठी दर वर्षी जगभरातील लाखो पर्यटक येत असतात. मात्र, दिवाळीत सलग सुट्ट्या आल्याने चौदा वर्षांवरील पर्यटकांची प्रतिदिन संख्या हजार-दीड हजारांहून साडेचार ते साडेपाच हजारांपर्यंत पोहोचल्याचे मागील तीन दिवसांत दिसून आले. त्यामुळे तीन दिवसांत एकाच वेळी 100 ते 150 नागरिक तिकीट घेण्यासाठी रांगेत उभे राहत होते. त्यामुळे शनिवारवाडा कर्मचार्यांची मात्र शनिवारी (दि. 29) मोठी तारांबळ उडाली.
शनिवारवाडा पार्किंग फुल्ल; नो- पार्किंगमध्ये गाड्या
शनिवारवाडा परिसरातील पार्किंग फुल्ल झाली. त्यामुळे पर्यटकांना गाड्या पार्क करण्यासाठी जागेची मोठी शोधाशोध करावी लागत होती. जवळपास कोणतेही वाहनतळ उपलब्ध नसल्याने पर्यटकांनी परिसरात बाजीराव व शिवाजी रस्त्यावर नो-पार्किंगमध्ये गाड्या पार्क केल्या होत्या. बाजीराव रस्त्यावरील शनिवारवाडा प्रवेशद्वाराबाहेर, तर शनिवारवाडा पार्किंगच्या प्रतीक्षेत अनेक पर्यटकांच्या गाड्यांची रांग बाजीराव रस्त्यावर लागल्याचे दिसून आले. त्यामुळे बाजीराव रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी झाल्याचे शनिवारी (दि.29) पाहावयास मिळाले.
पर्यटकांचे वाहतूक कोंडीतूनच पुणे दर्शन
शनिवारवाडा पार्किंगमध्ये प्रवेश करण्यासाठी शिवाजी रस्ता व बाजीराव रस्ता अशा दोन्ही बाजूंनी प्रवेश करता येतो. शिवाजी रस्त्यावरील पार्किंगचे गेट अर्धवटच उघडण्यात येत असल्याने येथून फक्त दुचाकीच आत जाऊ शकत होत्या. त्यामुळे इथून येणारी चार चाकी आजूबाजूलाच पार्क केल्याचे दिसून येते. याबाबत दर्शनी भागात पार्किंगबाबत कुठलाही महिती-फलक नाही. त्यामुळे चारचाकी वाहनचालकांनी गाड्या पार्क करायच्या कुठे, या गोंधळात पर्यटक पडतात. त्यामुळे ते प्रवेशद्वारावरच रेंगाळलेल्या अवस्थेत दिसून आले. यामुळे प्रवेशद्वारावरूनच पर्यटकांचे वाहतूक कोंडीतूनच पुणे-दर्शन होत आहे.
इतक्या पर्यटकांनी दिली भेट
गुरुवार (दि.27) 5,284
शुक्रवार (दि.28) 4,972
शनिवारी (दि. 29) 5,421

