

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील जांभोरी आणि परिसरात शनिवारी (दि. १६) दुपारी तुफान गारपीट झाली. या गारपिटीमुळे करवंदे, आंबे, हिरडा आणि जनावरांसाठी ठेवलेल्या सुक्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या रानमेवा म्हणजेच करवंद, जांभळे, आवळे, आंबे, तोरण आदी पाडाला लागायला सुरुवात झाली होती. परंतु, आजच्या गारपिटीने हा रानमेवा रान पाखरांच्या तोंडचा हिसकावून घेतला आहे. हाच काळ पक्ष्यांच्या विनीचा काळ असतो. परंतु, या गारपिटीने पक्ष्यांच्या घरट्यांवरदेखील गारांचा मारा झाल्याने याचा परिणाम पक्ष्यांच्या प्रजननावरदेखील दिसून आला.
या भागातील शेतकऱ्यांचा अर्थार्जनासाठी असलेला प्रमुख स्रोत म्हणजे हिरडा. आजच्या गारपिटीने बळीराजाच्या हिरड्यावरच घाला घातला असून, या वर्षीचा हिरडा हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
याच काळात या भागातील शेतकरी रोपे भाजणीची कामे करीत असतो. परंतु, गारपीट आणि तुफान पावसामुळे तोडलेला राब, गवर, पाडलेले रोमठे आणि पारचोळा वाया गेला आहे.
भातपिकासाठी केलेली पूर्वतयारी पूर्णतः वाया गेल्यामुळे येथील शेतकरीराजा या गारपिटीने कोलमडून पडला आहे. पावसाळ्यात जनावरांसाठी साठवलेला पेंढा पूर्णतः भिजला गेल्याने तो काळा पडण्याची शक्यता आहे. या भागातील गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तत्काळ प्रशासनाने पंचनामे करावेत, असे बिरसा ब्रिगेड आंबेगावचे माजी सचिव विकास पोटे, अविनाश केंगले, बिरसा ब्रिगेडचे जांभोरीचे अध्यक्ष सुनील गिरंगे यांनी केली आहे.