

पुणे : खाते उतारा (8 अ), फेरफार नोंद (गाव नमुना 6) आणि सातबारा उतारा या सुविधा नागरिकांना पूर्वीपासूनच महाभूमी या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आता मात्र सातबारा, फेरफार उतार्यावरील नोंद घेण्याची प्रक्रिया वेळेत पार पाडावी, तसेच जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना देखरेख ठेवता यावी, यासाठी जमीन माहितीपीठ (लॅन्ड डॅशबोर्ड) सुविधा भूमिअभिलेख विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डॅशबोर्डमुळे नोंदी घेण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे. भूमिअभिलेख, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात तसेच महसूल या विभागाकडून देण्यात येणार्या 66 ऑनलाइन सुविधा एकाच डॅशबॉर्डवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.
खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर प्रत्यक्षात त्यांची नोंद फेरफार आणि सातबारा उतार्यावर घेण्याची प्रक्रिया आहे. त्यामध्ये अनेकदा विलंब होतो. या विलंबामागची कारणे काय आहेत, त्यांचा वेळेत निपटारा का होत नाही, यावर देखरेख ठेवणारी कोणतीही यंत्रणा नाही. ती आता या डॅशबोर्डच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हानिहाय जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना या सुविधा डॅशबोर्डच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या आहेत. डॅशबोर्डच्या माध्यमातून किती सातबारा आणि फेरफार उतारे अथवा खाते उतार्याच्या नोंदी प्रलंबित आहेत, त्या मागणीची कारणे काय आहेत, यावर देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. महसूल विभागाच्या अंतर्गत भूमिअभिलेख, नोंदणी व मुद्रांक शुल्क हे तीन विभाग समाविष्ट आहेत.
मात्र, प्रत्येक विभागाकडून स्वतंत्रपणे ऑनलाइन सुविधा दिल्या जातात. त्यामुळे कोणत्या विभागाकडे काम आहे, त्या विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना सेवा घ्यावी लागते. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांची नेमणूक राज्य सरकारकडून करण्यात येते. त्यामुळे कोणत्या विभागाकडून कोणत्या सुविधा दिल्या जातात, यांची अनेकदा इतर खात्याच्या अधिकारी अथवा कर्मचार्यांना माहिती नसते. प्रत्येक विभागाच्या स्वतंत्र ऑनलाइन सुविधा असल्यामुळे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनादेखील त्यावर देखरेख ठेवणे अशक्य होते. देशात सर्वाधिक ऑनलाईन सेवा देण्यास महाराष्ट्र आघाडीवर असूनही त्याचा फारसा फायदा नागरिकांना मिळत नाही.
गुजरातमध्ये अशा पद्धतीने 33 सुविधा एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध करून दिल्या जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही महसूल विभागाच्या सर्व सुविधा एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतला होता. त्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यासाठीची प्रक्रिया भूमिअभिलेख विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.
त्यानुसार लॅन्ड डॅशबोर्ड सुविधा भूमिअभिलेख विभागाकडून विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे एकाच संकेतस्थळावर तीनही विभागांकडून कोणकोणत्या सुविधा ऑनलाइन दिल्या जात आहेत त्यांची माहिती एकाच पानावर उपलब्ध झाली आहे.
देखरेख ठेवणे शक्य
प्रत्येक जिल्ह्याच्या आणि पाचही विभागांच्या आयुक्तांच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध झाली आहे. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना त्यावर देखरेख ठेवणे शक्य होणार आहे, अशी माहिती भूमिअभिलेख विभागाच्या ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली.
अशा आहेत सुविधा
भूमिअभिलेख विभाग ः 9 सुविधा
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग ः 11 सुविधा
महसूल विभाग ः 17 सुविधा
आपले सरकार पोर्टलवर ः 33 सुविधा
हे ही वाचा :