

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागातर्फे घेण्यात येणारी यंदाची सेट परीक्षा नियोजित वेळेनुसारच घेण्यासाठी विद्यापीठाने पावले उचलली आहेत. एकीकडे परीक्षेची तयारी सुरू केली असताना दुसरीकडे सेट विभागाच्या समन्वयकपदी डॉ. प्रभाकर देसाई यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते सोमवारी पदभार घेणार आहेत. त्यामुळे सेट परीक्षा नियोजित वेळेतच होणार असल्याची माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्यात उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत सुमारे पाच हजार 500 प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया सुरू असून, सेट परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास पात्र उमेदवारांना या भरतीत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी नोडल एजन्सी असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परीक्षेचे वेळापत्रक तातडीने जाहीर करण्यात यावे, अशी मागणी सेट परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी केली आहे.
डॉ. प्रभाकर देसाई सोमवारी स्वीकारणार पदभार
सेट विभागात महिनाभरापूर्वीच विभागप्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेल्या डॉ. अविनाश कुंभार यांनी नुकताच राजीनामा दिला. त्यामुळे विभागाला समन्वयकच नव्हते. परंतु आता परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांचा परीक्षा विभागाचा पदभार संपुष्टात आला आहे, तसेच त्यांची सेट विभागाच्या समन्वयकपदी नेमणूक करण्यात आली आहे. सोमवारी डॉ. देसाई पदभार स्वीकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सेट परीक्षेसाठी नवीन सेट समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून, परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे परीक्षा नियोजित वेळेतच पार पाडण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
डॉ. प्रफुल्ल पवार, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ