Servants of India case : विद्यार्थांना दीड वर्षापासून गुणपत्रिकाच मिळाल्या नाहीत

Servants of India case : विद्यार्थांना दीड वर्षापासून गुणपत्रिकाच मिळाल्या नाहीत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गोखले इन्स्टिट्यूटमध्ये व्यवस्थापन मंडळ ते विद्यापीठ अनुदान आयोग यांना मॅनेज करून कुलगुरू झालेले डॉ. अजित रानडे हे ज्युनो सॉफ्टवेअर या कंपनीमार्फत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचा बाजार मांडत असल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गेल्या दीड वर्षापासून गुणपत्रिकाच मिळालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी-पालक हैराण झाले आहेत. प्रा. मुरली कृष्णा यांनी डॉ. अजित रानडे हे गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू होऊ शकत नाहीत म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे तक्रार केली. मात्र, पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत.

दरम्यान, कुलगुरू डॉ. रानडे यांचे बरेच कारनामे पुढे येऊ लागले आहेत. ज्योनो सॉफ्टवेअर ही आनंद देशपांडे यांची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीला लाभ मिळावा व त्यात स्वतःचा वाटा राहावा, तसेच त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळावी, या हेतूने आनंद देशपांडे यांना व्यवस्थापन मंडळाचे सदस्य करून घेतले. यावरून शिक्षणाचे बाजारीकरण सुरू आहे, याचा पुरावा गोखले इन्स्टिट्यूटच्या निमित्ताने दिसून आला आहे.

धर्मादाय आयुक्तांकडे बदल अर्जावर सुनावणी सुरू असताना नवीन आयुक्त आल्याने प्रकरण पुढच्या तारखेला मांडले जाईल. ज्योनो कंपनीमुळे मुलांच्या परीक्षांवर परिणाम होत आहे. परीक्षा नियंत्रक यांना हा सर्व प्रकार आटोक्यात आणता आला नाही, त्यामुळे यातून गैरफायदा घेणा-या विद्यार्थ्यांचं चांगभलं आहे. सॉफ्टवेयरचे अपयश असूनही डॉ. रानडे यांचा आग्रह आहे की त्यांच कंपनीला काम द्यावे, कारण यात आनंद देशपांडे यांच्या व्यावसायिक भागेदारीचा लाभ मिळावा म्हणून गोखले इन्स्टिट्यूटचा गैरवापर कुलगुरू रानडे करीत आहेत.

प्रवीणकुमार राऊत, हरकतदार

मुरली कृष्णा यांच्या तक्रारीवर निर्णय का नाही

रानडे यांनी ठेवलेल्या अतिरिक्त कर्मचा-यांच्या वतीने टाळाटाळ केली जात आहे. डॉ. रानडे यांना सोसायटीच्या वतीने शिफारस केलेल्या कुलपती डॉ. राजीव कुमार यांचे पाठबळ आहे. कारण अध्यक्ष दामोदर साहू, सचिव मिलिंद देशमुख यांच्या मुलांना सोसायटीमध्ये आजीवन सदस्य करून त्यांच्या आयुष्याची सोय लावून द्यायची आहे. त्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटमार्फत आर्थिक लाभ करून घेण्यासाठी पात्रता नसताना डॉ. अजित रानडे यांना कुलगुरू करण्यासाठी डॉ. राजीव कुमार यांना मॅनेज केले आहे. उलट मुरली कृष्णा यांनी तक्रार करूनही संस्थेतून बाहेर काढले गेले.

संस्थेत कुलगुरू डॉ. अजित रानडेंची दहशत

सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीमध्ये 1990 पासून एकही आजीवन सदस्य घेतला गेला नाही. मात्र, सचिव मिलिंद देशमुख, अध्यक्ष दामोदर साहू यांच्या मुलाला आणि परस्पर संस्थेची जमीन विकून धर्मादाय आयुक्तांची फसवणूक करणारे सदस्य यांच्या नातवाला सदस्य करण्यासाठी घाई केली गेली. त्यावर आक्षेप घेणा-या आत्मानंद मिश्रा व इतर विश्वस्तांना संस्थेतून काढून देण्याची धमकी दिली जात आहे. विद्यार्थी रानडे यांच्या भीतीपोटी बोलत नाही, तसेच नियमित असणारे कर्मचारी नोकरी जाईल म्हणून घाबरून सर्व अन्याय सोसत आहेत.

आता प्रकरण दाबण्याचे प्रकार सुरू

या सर्व स्थितीचा अभ्यास करून प्रवीणकुमार राऊत यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी त्यावर तातडीने कारवाईसाठी तयारी दर्शविली. सचिव मिलिंद देशमुख, वरिष्ठ सदस्य पी. के. द्विवेदी आता सर्व प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. धर्मादाय आयुक्तांकडे आत्तापर्यंत संस्थेचा वार्षिक अहवाल व प्रवीणकुमार राऊत यांच्या दस्तावेज देण्यासाठी नकार दिला जात आहे. शिवाय प्राप्तिकर विभागात केलेल्या तक्रारीला सुद्धा रोखले गेले असावे, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

दीड वर्षापासून गुणपत्रिकाच नाहीत

डॉ. अजित रानडे यांनी स्वतःच्या धोरणांना राबवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे. त्यासाठी आपलेच आप्तगण नेमले. त्यांना गलेलठ्ठ मानधन उपलब्ध करून दिले. ज्याचा अधिभार मुलांच्या फीवर पडतो. मुलांच्या फीमध्ये दरवाढ करून हुशार व गरीब विद्यार्थ्यांना गोखले इन्स्टिट्यूटसारख्या प्रतिष्ठित व सामाजिक शैक्षणिक संस्थेत शिक्षणापासून वंचित केले जात आहे. ज्युनोच्या इन्टरप्राइजेज रिसोर्स प्लानिंगमुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका गेल्या दीड वर्षापासून मिळालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नैराश्य आले. त्यांच्या पालकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र रानडे यांनी तो आवाज दाबला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news