

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अलाहाबादमधील संस्थेच्या 13 हजार चौ. फूट जागेची शासकीय कामाच्या नावाने अफरातफर केली. यामध्ये किमान 75 लाख रुपये बेहिशेबी आढळून आले आहेत. त्याबाबत कानपूरमधील न्यायालयात धाव घेणार्या लेखपालाला काढून टाकले. तर संस्थेचे विश्वस्त अमरीश त्रिपाठी, प्रेम कुमार द्विवेदी यांना मिलिंद देशमुख हे संस्थेचे सचिव म्हणून खुलेआम गैरव्यवहार करण्यास पाठिंबा का देत आहेत, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था भारतात स्वातंत्र्यपूर्व काळापासून काम करत आहे. शिक्षण, आरोग्य, आदिवासी सेवा, मद्यबंदी, कारागार कल्याण, ग्रामीण विकास, जन प्रबोधन यासारखे उपक्रम राबविण्यासाठी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी तसेच सहकार्यांनी भारतात इमारती, शेती, तसेच त्याला उपजीवित ठेवण्यासाठी संसाधने उपलब्ध करून दिली. मात्र, 1990 नंतर मिलिंद देशमुख हे संस्थेचे विश्वस्त झाल्यापासून त्यांनी महाराष्ट्रातील दुसर्या कुणालाही संस्थेचे विश्वस्त होता येऊ नये अशी आखणी केली. विश्वस्त म्हणून पहिल्यांदा आपल्या मेहुण्याला संस्थेत दाखल करून घेतले.
मिलिंद देशमुख यांनी गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांची पात्रता नसताना कुलगुरू पदावर नियुक्त केली. कारण, इन्स्टिट्यूटचा पैसा देशमुख यांना त्यांचे गैरप्रकार मिटविण्यासाठी रानडे देत आहेत. नागपूरमधील शाखेसाठी दीड कोटी रुपये शासकीय कामानिमित्त दिल्याचा बहाणा सांगत त्याचा हिशेब जाहीर झाला नाही. अलाहाबादमधील संपत्तीसाठी इतर विश्वस्ताचा सहभाग घेण्यात रानडे असेच सहभोगी आहेत का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, डॉ. रानडे हे मराठा आरक्षणाच्या अहवालाचे नेतृत्व करत या प्रकरणाची दिशा तर बदलत नाहीत ना… असा संशय अभ्यास करताना येतो.
प्रवीणकुमार राऊत, तक्रारदार
13 हजार चौरस फूट जागेचा घोळ
रानडे ट्रस्टची 16 एकर जमीन गडप प्रकरणात मेहुण्याला सामील केले हे कळताच मेहुणे बाहेर पडले. लगेच मिलिंद देशमुख यांनी संस्थेत व्यवस्थापक पद निर्माण करून स्वतः च्या मुलाला ठेऊन घेतले. यासाठी इलाहाबादमधील संस्थेच्या 13 हजार चौरस फूट जागेची शासकीय कामाच्या नावाने अफरातफर केली. यामध्ये किमान 75 लाख रुपये बेहिशेबी आहेत. त्याबाबत कानपूरमधील न्यायालयात धाव घेणार्या लेखपालाला काढून टाकले.
कोरम नसताना ठराव पास केला!
संस्थेचे विश्वस्त अमरीश त्रिपाठी, प्रेम कुमार द्विवेदी यांना मिलिंद देशमुख हे संस्थेचे सचिव म्हणून खुलेआम गैरव्यवहार करण्यास पाठिंबा का देत आहेत? अमरीश त्रिपाठी यांच्या मुलाला संस्थेत सदस्य करू असे आश्वासन देऊन मिलिंद देशमुख यांनी स्वतःचा मुलगा चिन्मय देशमुख याला सदस्य होण्यासाठी कार्यकारिणीत कोरम नसताना ठराव पास केला, यावर आत्मानंद मिश्रा यांनी हरकत नोंदविली, मात्र त्यांनाही धर्मादायच्या संगनमताने हरकत मागे घेण्यास बाध्य केले.
कोर्या चेकवर सह्या कशा?
जुलै 2023 पासून या प्रकरणात काही कारवाई झाली नाही. याचा लाभ घेऊन मिलिंद देशमुख यांनी मुलाला विश्वस्त करण्यासाठी परस्पर बदल अर्ज केला. प्रवीणकुमार राऊत हे नागपूर शाखेचे सदस्य असताना देशमुख यांनी त्यांच्या मुलाला विश्वस्त करण्यासाठी त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला असता राऊत यांनी याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे बदल अर्जावर हरकत नोंदवली. संस्थेचे अध्यक्ष दामोदर साहू यांनी कोर्या धनादेशावर 9 जून रोजी सह्या केल्या याचे प्रवीणकुमार हे प्रत्यक्षदर्शी आहेत. मिलिंद देशमुख संस्थेच्या पैशाचा वाटेल तसा वापर करतात. त्यात काही विश्वस्त सहयोगी सहभोगी आहेत. सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी ही ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, सार्वजनिक असलेली संस्था कौटुंबिक होऊ नये म्हणून लढा देण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावण्याची गरज आहे.