

पुणे; पुढारी वृत्तसेवा : माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे हे ओरडून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण नाले साफ केले जातात, गटारे साफ केले जातात. सध्या माणसाला साफ करण्याची गरज आहे. कारण माणूस आज घाण झालेला आहे, जातीमुळे, भ्रष्टाचारामुळे, हिसेंमुळे. माणूस साफ करण्याची योजना हीच साहित्य निर्मितीमागची भूमिका असली पाहिजे आणि हे काम लेखकच करू शकतात. कारण ते. माणसाला आणि माणसाच्या संस्कृतीला स्वच्छ करणारे कलावंत आहेत, असे मत सरस्वती सन्मानप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी सोमवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्या 2021 आणि 2022 या वर्षातील विशेष साहित्य पुरस्कारांचे वितरण डॉ. लिंबाळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोशाध्यक्षा सुनीताराजे पवार आणि प्रदीप दाते यावेळी उपस्थित होते. डॉ. लिंबाळे म्हणाले, लेखक लिहितो म्हणजे तो त्याच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो.
कलेचा उत्सव साजरा करणे म्हणजे स्वातंत्र्य. ज्याचे मन स्वतंत्र आहे तोच लेखक होऊ शकतो. लिहिणे म्हणजे काय न्यायाच्या प्रती संवेदनशील असणे होय. तरच लेखक माणूस घडवू शकतो. लेखक हा विशेष माणूस असतो. कारण लेखकाला मानवतेची बाजू घ्यावी लागते. लेखकाला नेहमीच अन्यायाविरुद्ध चीड असते. लेखक गमंत किंवा टाईमपास म्हणून लिहित नाही. आपली ती ऐतिहासिक जबाबदारी आहे.
अन्याय होत आहे, त्याविषयी आपल्या मनामध्ये चीड येत नसेल तर आपले मन मेलेले आहे. अन्यायाविरुद्ध आपल्याला चीड यायला हवी, ती कोणाबाबतही असो…मी जिंवत असेल तर ज्याच्यावर अन्याय झाला आहे, त्याचे जातीचे प्रमाणपत्र बघत बसणार नाही, तो दलित आहे का हा विचार करणार नाही. अन्यायविरुद्ध बोलणे, त्यांच्याविरुद्ध चीड वाटणे हे माणूसपणाचे लक्षण आहे. हे माणूसपण म्हणजे कलावंत.
– डॉ. शरणकुमार लिंबाळे, ज्येष्ठ साहित्यिक