पिंपरी : बापरे ! शहरात दररोज ४० लाखांचा धूर, दररोज 62 हजार पॅकेटची विक्री

पिंपरी : बापरे ! शहरात दररोज ४० लाखांचा धूर, दररोज 62 हजार पॅकेटची विक्री

भास्कर सोनवणे : 

पिंपरी : आरोग्यास हानिकारक असल्याचा ठसठशीत संदेश असणार्‍या सिगरेटच्या पेट्यांची दररोज 40 लाखांची विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव 'पुढारी'च्या पाहणीतून पुढे आले आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्ये सिगरेटचे व्यसन वाढत असल्याचेही निरीक्षण आहे. सिगरेट पिणे आरोग्यास धोकादायक असूनसुद्धा येथील महाविद्यालयीन तरुण, तरुणी व ज्येष्ठ नागरिक महिन्याकाठी सुमारे 12 कोटींचा धूर सिगरेटमधून उडवत असल्याचे धक्कादायक वास्तव पिंपरी- चिंचवड शहर परिसरातील पाहणीतून समोर आले आहे.
सिगरेट ओढणे समजतात स्टेटस, फॅशन आयटी पार्कमध्ये नोकरी तसेच शिकण्यासाठी शहरात आलेले तरुण, दिवसाढवळ्या आणि रात्री उशिरापर्यंत घोळक्याने सिगरेट ओढतानाचे चित्र सर्रास दिसत आहे. काही 'फॅशन', तर काही 'स्टेटस' म्हणून सिगरेटच्या आहारी गेले आहेत.

इलेक्ट्रॉनिक सिगरेट

ज्या सिगरेटमधून धूर निघत नाही, अशी सिगरेट म्हणजेच ई सिगरेट. किंवा इलेक्ट्रॉनिक सिगरेट. सातशेपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत या सिगरेटची किंमत आहे. काही महाविद्यालयांच्या परिसरातच याची विक्री होत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

खून अन् हाणामार्‍या

सिगरेट न दिल्यामुळे बरेचदा भांडणे, मारामार्‍या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सिगरेट न दिल्याच्या रागातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यामुळे या व्यसनामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे.

एका डिस्ट्रीब्युटरमधून दररोज 10 लाख सिगरेटची मागणी

पिंपरी चिंचवडमध्ये सिगारेट विक्री करणारे चार डिस्ट्रीब्युटर्स आहेत. एका डिस्ट्रीब्युटरमधून सप्लायर्सना साधारण 10 लाखांचा पुरवठा केला जातो, तसे चार डिस्ट्रीब्युटर्स आहेत. यामुळे दररोज किमान 40 लाख रुपयांचा पुरवठा एकट्या पिंपरी- चिंचवड शहराला केला जातो. यामुळे महिन्याला तब्बल 12 कोटींचा पुरवठा होतो.

पोलिसांचा नाही वचक

शहरातील शाळा, महाविद्यालये, रेल्वेस्थानके, सरकारी कार्यालये, औद्योगिक वसाहत येथे सिगरेट विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पोलिसांचा वचक नसल्याने शहरात रात्री सुरू असणार्‍या दुकानांमध्ये सिगरेट मिळते. रात्री उशिरापर्यंत घोळक्याने सार्वजनिक ठिकाणीही सिगरेटचे झुरके घेण्याचे प्रकार सुरू असतात.

पालकांचा दबाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे, पालकांचा अंकुश हवा. साथसंगतीमुळेही काही आकर्षित होतात. व व्यसनाला बळी पडतात. मुलांनी जबाबदारीने वागले पाहिजे.
                                          – सचिन काळभोर, सामाजिक कार्यकर्ता

दोन- तीन वर्षांपासून तरुणांमध्ये सिगरेट पिण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. आमच्याकडे तरुणांबरोबरच मुलींचेही प्रमाण वाढल्याचे दिसून आले. हल्ली तरुण तंबाखू सिगरेटला लहान व्यसन समजतात, पण ते दारूपेक्षाही घातक आहे. सिगरेट पिताना सुरुवातीला आनंद मिळतो, ताण कमी होतो असे त्यांना वाटते ; पण ते नकळतपणे व्यसनाकडे ओढले जातात. सिनेमा पाहून हिरोंना ते आपले आदर्श मानतात. त्यांचे अनुकरण करतात. यासाठी सिनेमाही काही प्रमाणात जबाबदार आहे.
                                              – डॉ. मुक्ता पुणतांबेकर, मुक्तांगण, पुणे

सिगरेटमुळे तरुणांना तात्पुरता आनंद मिळतो. व्यसनात न गुंतता व्यायाम पर्याय निवडावा. फ्यूचरवर लक्ष द्यावे. सिगरेटमुळे हृदयाचे ठोके वाढतात. याने अकाली मृत्यू ओढवतो. महाविद्यालयात जाऊन समूपदेशनाची गरज आहे.
                        – पवन साळवे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, वायसीएम

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news