

पुणे : पुढारी वृत्तसेवा : फक्त युवावर्गच नव्हे, तर सर्व वयोगटातील लोकांमध्ये सेल्फीची वाढती क्रेज पाहता विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांना कॅम्पसमधील मोक्याच्या ठिकाणी सेल्फी पॉईंट्स उभारण्यास सांगितले आहे. मात्र, यासाठी यूजीसीकडून काही नियम करण्यात आले आहेत. शिक्षण मंत्रालयाने शेअर केलेल्या थ—ीडी लेआउटमध्ये मान्यताप्राप्त डिझाइननुसारच संस्थांना सेल्फी पॉइंट ठेवता येणार आहेत.
यासंदर्भात यूजीसीचे सचिव मनीष जोशी म्हणाले , सेल्फी पॉइंटच्या थीममध्ये एक भारत, श्रेष्ठ भारत यासारख्या राष्ट्रीय उपक्रमांचा आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील प्रमुख क्षेत्रांचा समावेश असेल. विद्यार्थी आणि इतर नागरिकांना काही विशेष क्षण टिपण्यासाठी आणि सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी तसेच देशाप्रती सामूहिक अभिमानाची भावना वाढवण्यासाठी या सेल्फी पॉईंटचा उपयोग होईल. हे सेल्फी पॉइंट्स केवळ अभिमानाचे स्रोतच नाहीत, तर जागतिकस्तरावर भारताच्या विकासाला चालना देणार्या परिवर्तनात्मक उपक्रमांबद्दल प्रत्येक नागरिकाला प्रबोधन करतील.
भारताच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीतून घेतलेल्या प्रेरणेने तरुणांची ऊर्जा आणि उत्साह यांचा उपयोग करून त्यांची मने तयार करण्याची अनोखी संधी या माध्यमातून मिळणार आहे. या संस्थांमधील सेल्फी पॉइंट्स राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी आणि तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी गतिशील आणि आकर्षक जागा म्हणून उदयास येतील, असेही जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा