तळेगाव दाभाडे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या यंदाच्या 16 व 17 वर्षाखालील निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत येथील मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलच्या सारस जोगी, संतोष चौहान आणि चैतन्य कोंडभर या युवा खेळाडूंची निवड झाली आहे. ज्येष्ठ प्रशिक्षक अनिल नाईक, माजी रणजीपटू हेमंत किणीकर आणि मनिष देसाई यांच्या दोन दशकाहून अधिकच्या मेहनतीचे फलित या गुणी खेळाडूंच्या निवडीने समोर आले असल्याचे संस्थेचे आणि जिनियस क्रिकेट क्लबचे संचालक सुहास गरूड यांनी 'दैनिक पुढारी' प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
सारस आणि संतोष यांची राज्याच्या 16 वर्षांखालील संघात तर चैतन्यची 17 वर्षांखालील राज्याच्या महाविद्यालयीन संघात निवड झाली आहे. या तिघांसह गतवर्षी उल्लेखनीय कामगिरी केलेले ओंकार जाधव आणि हाँगकाँग संघाकडून निवड झालेले राहुल संभूस या तळेगावकर क्रिकेटपटूंचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला. या वेळी संस्था अध्यक्ष गणेश खांडगे, उद्योजक नंदकुमार शेलार व दादासाहेब उर्हे, सुनील वाळुंज, ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक अनिल नाईक, माजी रणजीपटू व प्रशिक्षक हेमंत किणीकर, मनीष देसाई, दत्तात्रेय वाळके, किरण भोसले, प्रशांत कांबळे, एस. बेहेनवाल, वीरेंद्र हांडेकर, प्रसाद सावंत आदी आवर्जून उपस्थित होते
क्रिकेटमध्ये करिअर जीनियस क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोराडे, किणीकर यांनी मार्गदर्शन केले. क्रिकेट प्रशिक्षणाच्या सर्व सेवासुविधा शाळेत करून देण्याचा संकल्प गणेश खांडगे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा