

Increased security at Pune airport
पुणे : युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळाने विमानतळावर सुरक्षेत वाढ केली असून, त्यादृष्टीने अनेक नवीन उपाययोजना येथे लागू करण्यात आल्या आहेत.
संपूर्ण देशात हाय अलर्ट लावण्यात आला आहे. सर्वत्र कडक तपासणी केली जात आहे. खासकरून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे विमानतळावरील सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. विमानतळाच्या सुरक्षेसाठी असलेल्या सीआयएसएफच्या जवानांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
विमानतळाच्या परिसरातील आणि आसपासच्या सर्व विमान वाहतूक संबंधित आस्थापनांवरील देखरेख वाढवण्यात आली आहे. प्रवाशांची आणि त्याच्या सामानाची यासह कार्गो मालाची सुध्दा कसून तपासणी केली जात आहे.
सुरक्षित बोर्डिंगसाठी सर्व विमान उड्डाणांसाठी शंभर टक्के सेकंडरी लॅडर पॉइंट चेकिंग (एसएलपीसी) अनिवार्य करण्यात आले आहे. यासोबतच, विमानतळकडे जाणारे रस्ते, टर्मिनलचे प्रवेशद्वार आणि पार्किंग क्षेत्रांमध्ये वाहनांची आणि कर्मचार्यांची तपासणी वाढवण्यात आली आहे. विमानतळ परिसराची सुरक्षा स्थानिक पोलीस दलाच्या समन्वयाने अधिक वाढवण्यात आली आहे.
प्रवाशांना टर्मिनलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांच्या सामानाची बॅगेज तपासणी बॅगेज स्क्रीनिंगमशिनद्वारे अधिक बारकाईने केली जात आहे. कार्गो ऑपरेशन्ससाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात आल्या आहेत, ज्यात स्फोटक शोधण्याची क्षमता असलेल्या उपकरणांद्वारे मालाची तपासणी वाढवण्यात आली आहे आणि कार्गो टर्मिनल्सवर अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. असे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.