

पुणे: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज डेअरीकडून मंगळवार दिनांक 13 मेच्या पहाटेपासून म्हशीच्या फुल क्रीम दूध आणि प्रमाणित दूध विक्रीदरात प्रतिलिटरला प्रत्येकी दोन रुपये वाढ लागू केली आहे, अशी माहिती संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी दिली आहे.
विक्री दूध दरवाढीच्या निर्णयामुळे आता म्हशीच्या फुल क्रीम दुधाचा दर (6.5 फॅट व 9.00 एसएनएफ) प्रतिलिटरला 72 वरून 74 रुपये झाला आहे. तसेच प्रमाणित दुधाचा प्रतिलिटरचा दर (4.5 फॅट व 8.5 एसएनएफ) 62 वरून 64 रुपये करण्यात आला आहे. (latest pune news)
कात्रज दूध संघाने म्हशीच्या दूध खरेदीदरात यापूर्वीच वाढ केली होती. तसेच वाहतूक व इतर खर्चात वाढ झाल्याने दूध विक्रीदर वाढविणे क्रमप्राप्त झाल्याने संघाने म्हैस दुधाच्या विक्रीदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी ग्राहकांनी म्हैस दूध विक्रीदराची नोंद घ्यावी, असेही त्यांनी कळविले आहे.