

बारामती; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा पहिला टप्पा नुकताच झाला. यानंतर येत्या दोन, तीन महिन्यांत दुसरा टप्पा पार पडणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात निवडून आलेल्यांकडूनही जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तालुक्यातील बहुतांश ठिकाणी प्रस्थापितांविरोधात मतदारांमध्ये रोष दिसून आला. काही ठिकाणी गावकी-भावकीच्या जिवावर तारले गेले. काही ठिकाणी परिवर्तन झाले. तरुणांना बदल हवा आहे.
तोचतोचपणा, पारंपरिक गणिते बदलायची असेच सगळीकडे वातावरण होते. बदल करायचा हे मनात ठेवून अनेकजण निवडणुकीत लढले. आता मात्र निवडणूक पार पडली, त्यामुळे झाले गेले विसरून गावच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज नागरिक व तरुण व्यक्त करत आहेत. नवीन सदस्यांनी गावासाठी जे काही करता येईल ते करावे. बारामती तालुक्याला विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. मात्र, त्याचा योग्य विनियोग होत नसल्याने कित्येक वर्षांपासून प्रश्न सुटलेले नाहीत.
विकासाच्या मुद्याला निवडणुकीत बगल दिली गेली. मात्र, झालेले विसरून गावातील प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गावाला गरज आहे. बहुतांश ग्रामपंचायतीत सदस्य ठेकेदार असतात. पाच वर्षे कामे वाटून घेतात आणि स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतात. त्यामुळे सदस्यांना गावातील कोणतेच काम मिळू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.
सरपंच व सदस्य स्वतःच ठेकेदारीत अडकत असल्याने कामाचा दर्जा ढासळला आहे. राज्य शासन, जिल्हा परिषद, विरोधी पक्षनेते अजित पवार, विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमांतून विविध प्रकारचा निधी विकासकांसाठी दिला जातो. मात्र, तरीही ग्रामस्थांचे मूलभूत प्रश्न वर्षानुवर्षे सुटले नाहीत. आरोग्य, शिक्षण, दिवाबत्ती, पाणी, रस्ते, सार्वजनिक शौचालये आदी प्रश्न जैसे थे आहेत. ते सोडविण्यासाठी एकजूट असणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीचा महसूल वाढीसाठी प्रयत्न गरजेचा
ग्रामपंचायतीचा महसूल वाढण्यासाठी सार्वजनिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. यातून ग्रामस्थांच्या मूलभूत गरज भागण्यास मदत होईल. आठवडे बाजार, गाळे, छोटे- मोठे उद्योग, महिला बचतगटांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि यातून ग्रामपंचायतीने ठोस उत्पन्न मिळेल, यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. नव्याने निवडून आलेल्या सरपंच, सदस्यांना थकलेली घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. पाणीपट्टी वसुलीचे शिवधनुष्यही पेलावे लागणार आहे.