

पुणे; पुढारी वृत्तसेवा: एखादे अॅप डाऊनलोड करून ते इन्स्टॉल करणे ही गोष्ट कोणासाठीही नवीन नाही. परंतु, शालेय विद्यार्थ्यांनी स्वत: एखादे अॅप तयार करणे, ही बाब नक्कीच नावीन्यपूर्ण आहे. अशाच अॅपनिर्मितीचे प्रशिक्षण शालेय विद्यार्थ्यांना देण्यासाठी आचार्य श्री विजय वल्लभ प्रशाला आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यात सामंजस्य करार नुकताच झाला. या करारांतर्गत विद्यार्थ्यांना विविध विषयांवर अॅपची निर्मिती कशी करावी, याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार असून, प्रत्यक्ष अॅपनिर्मितीचे धडे विद्यार्थी गिरवणार आहेत.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे अमेरिकेतील प्रतिनिधी जॉन डिचियारा आणि अॅडम हार्टले यांनी आणि प्रशालेतर्फे अध्यक्ष सुभाष परमार यांनी करारावर स्वाक्षर्या केल्या. या कराराद्वारे विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक प्रगतीतील शैक्षणिक योजना, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक योजना तसेच अभ्यासक्रमात अंतर्भाव असणार्या दैनंदिन जीवनातील विविध समस्या, अशा विविध उपयायोजनांवर आधारित अॅपची निर्मिती कशी करावी, हे शिकवले जाणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम 40 हून अधिक देशांमध्ये राबविला जात आहे. या वेळी परमार यांनी मनोगत व्यक्त केले. शाळा समितीचे विजयराज रांका, सुरेश परमार, पुखराज संघवी, सुरेश मुथा, सुरजित चौधरी, अजित भोईर आदी उपस्थित होते.