‘एससी’च्या 3.5 लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
पुणे : राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून देण्यात येणार्या शिष्यवृत्ती पैकी राज्य शासनाकडील हिश्शाची असलेली 40 टक्के म्हणजेच 735 कोटी 17 लाख रुपयांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. दरम्यान, केंद्र शासनाकडील असलेल्या 60 टक्के हिश्शाची रक्कम जमा होणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी राज्यातील सुमारे 4 लाख 35 हजार 600 विद्यार्थ्यांनी शिक्षण संस्थांमार्फत अर्ज केले होते. त्यापैकी 3 लाख 36 हजार 975 विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला असून, उर्वरित विद्यार्थ्यांचे अर्ज वेगवेगळ्या कारणास्तव प्रलंबित आहेत.
राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने दरवर्षी राज्यातील अनुसूचित जातीमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिंनी ते शिक्षण घेत असलेल्या विविध अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती दिली जाते. हे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांबरोबरच मुख्य प्रवाहात येऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर कौटुंबिक प्रगती व्हावी हा त्या मागील राज्य शासनाचा हेतू आहे. यासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने राज्य शासनामार्फत ही शिष्यवृत्ती दरवर्षी देण्यात येते. मागील काही वर्षांपासून या शिष्यवृत्तीमध्ये केंद्र शासनाने 60 टक्के हिस्सा उचलला आहे. तर राज्य शासनाचा 40 टक्के हिस्सा असतो. त्यानुसार ही शिष्यवृत्ती अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना देण्यात येते.
समाज कल्याण विभागामार्फत देण्यात येणार्या या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे. त्या शिक्षण संस्थेच्या वतीने किंवा संबंधित महाविद्यायामार्फत ऑनलाईन अर्ज पाठविणे बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणार्या शिष्यवृत्तीमधून संबंधित विद्यार्थ्यांचे तो ज्या अभ्यासक्रमात शिकत आहे, त्या अभ्यासक्रमाची प्रवेश फी जमा करण्यात येते.
दरम्यान, दाखल झालेल्या 2024-25 या वर्षीच्या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन दाखल झालेल्या 4 लाख 35 हजार 600 अर्जांपैकी आतापर्यंत 3 लाख 36 हजार 975 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. त्यापोटी 735 कोटी 17 लाखांचा निधी देण्यात आला आहे. उर्वरित 98 हजार 621 विद्यार्थ्यांचे अर्ज अजूनही कागदपत्रे किंवा तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित आहेत.
अशी आहे आकडेवारी
एकूण ऑनलाईन अर्ज : 4 लाख 35 हजार 600
शिष्यवृत्तीसाठी पात्र केलेले अर्ज : 3 लाख 36 हजार 975य
शिष्यवृत्तीस अपात्र झालेले अर्ज : 2 हजार 379

