पुणे : स्कॅनर बंद, कर्मचारीही नाहीत! रेल्वे स्थानकात शिरण्यासाठी अनेक मार्ग

पुणे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तपासणी करण्यासाठी सोमवारी आरपीएफ, रेल्वे पोलिस आणि रेल्वे प्रशासनाचा कोणताही कर्मचारी नव्हता.
पुणे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तपासणी करण्यासाठी सोमवारी आरपीएफ, रेल्वे पोलिस आणि रेल्वे प्रशासनाचा कोणताही कर्मचारी नव्हता.
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताना प्रवाशांची तपासणी करण्यासाठी कोणीही कर्मचारी नाही. सुरक्षा तपासणी यंत्र फक्त नावालाच आणि प्रवाशांच्या बॅगा तपासणी करण्याचे मशिनही बंदच. पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी विविध मार्ग, यातून कोणीही विनातिकीट आत येत असल्याचे 'पुढारी'ने केलेल्या पाहणीत आढळून आले. यावरून पुणे रेल्वे  स्थानक सुरक्षित राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे रेल्वे स्थानकातून चार दिवसांपूर्वी एका मुलाचे अपहरण झाले आहे. तर, रेल्वेतून दारूच्या बाटल्यांची तस्करी होताना आढळले आहे.

अशा घटना रेल्वे स्थानकावर घडतात कशा, त्या होण्याआधी रेल्वेच्या यंत्रणांकडून योग्य ती काळजी घेतली जाते का, रेल्वे स्थानकावर अधिकार्‍यांच्या नियमित गस्त होतात की नाही, यासंदर्भात दै. 'पुढारी'कडून सोमवारी (दि. 12) आणि मंगळवारी (दि. 13) सलग दोन दिवस पाहणी करण्यात आली. त्या वेळी येथे भयानक चित्र पाहायला मिळाले. पुणे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि मागील बाजूच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी कोणताही आरपीएफ अधिकारी पाहायला मिळाला नाही.

प्रवेशद्वारावरून प्रवासी मोठमोठ्या बॅगा घेऊन ये-जा करीत होते. त्यांच्या बॅगांची तपासणी होत नव्हती आणि बॅग तपासणी यंत्र देखील बंद होते. त्यामुळे प्रवासी बॅगांमध्ये नक्की काय घेऊन गेले, याची माहिती कशी मिळणार आणि एखाद्या प्रवाशाने चुकून एखादी वस्तू आत नेली आणि दुर्घटना घडली, तर याला जबाबदार कोण, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. रेल्वे प्रशासनासह सर्व यंत्रणांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून, प्रवाशांच्या जिवाला मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कुणीही या… बिनधास्त प्रवेश करा…
पुणे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर तर शेजारच्या हॉटेलमधून थेट प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जाता येते. सरकत्या जिन्याजवळून थेट प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जाणे सहज शक्य आहे. येथे खूप मोठा रस्ता आहे. हा बंद करणे आवश्यक आहे. त्यासोबतच आरपीएफ कार्यालयाजवळील पार्सल विभागातून थेट प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2 वर मार्गस्थ होता येते. त्यामुळे हे मार्ग प्रथमत: रेल्वे प्रशासनाने बंद करायला हवेत, असे प्रवाशांनी सांगितले.

पूर्ण वेळ अधिकारीच नाही…

पुणे रेल्वे स्थानकावर देखरेख करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्टेशन डायरेक्टर हे पद नियुक्त केले आहे. हा अधिकारी आयआरटीएस दर्जाचा असतो. त्याच्याद्वारे संपूर्ण रेल्वे स्थानकाची देखरेख केली जाते. मात्र, येथील पूर्वीचे स्टेशन डायरेक्टर सुरेश जैन यांची 15 दिवसांपूर्वी बदली झाली आहे. त्यांचा अतिरिक्त पदभार विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांना देण्यात आला आहे. मात्र, भिसे हे फक्त सकाळी एक ते दोनच तास पुणे रेल्वे स्थानकावरील केबिनमध्ये बसतात. त्यानंतर ते मुख्यालयात जातात. त्यामुळे येथे देखरेख व्यवस्थितरीत्या होत नसून, पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेसाठी येथे पूर्णवेळ अधिकार्‍याची आता गरज आहे.

सुरक्षा विभागाचा नो रिस्पॉन्स…

दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीने सोमवारी आणि मंगळवारी पुणे रेल्वे स्थानकावर स्थानकाच्या सुरक्षेबाबत पाहणी केली. त्या वेळी येथे सुरक्षेची ऐशीतैशी झाली होती. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी मंगळवारी वरिष्ठ विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त उदयसिंग पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेची जबाबदारी 'रेल्वे सुरक्षा बल' (आरपीएफ) आणि बाहेरील सुरक्षेची जबाबदारी लोहमार्ग पोलिस (जीआरपी) यांच्याकडे आहे. त्या जबाबदारीप्रमाणे या दोन्ही यंत्रणांचे कर्मचारी येथे असतात. जर येथे तसे नसेल तर त्यांना याबाबत तत्काळ सूचना केल्या जातील आणि येथील सुरक्षा कायमस्वरूपी करण्यात येईल. त्यासोबतच बॅग तपासणीचे बंद पडलेले मशिन तत्काळ दुरिस्त करण्यात येईल आणि स्थानकात प्रवेश करण्याचे इतर मार्ग बंद करण्यात येतील.

                                         – मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी,
                                                        रेल्वे, पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news