बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडी परिसरातील पासलकर चौक ते काकडेवस्ती चौक यादरम्यान सरगम चाळीसमोर (गल्ली नं. 1) ड्रेनेजलाइन तुंबल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये हे पाणी साचून राहत असल्याने वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याने वाहनचालक व पादचार्यांना ये-जा करणे अवघड झाले आहे. सकाळच्या वेळी या ड्रेनेजच्या लाइनचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असून, दिवसभर ते रस्त्यावरील खड्ड्यांत साचून राहत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असल्याने वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. त्यातच हा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. खड्ड्यांमध्ये सांडपाणी साचल्याने अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांचा अपघात होत आहेत.
या समस्येबाबत महापालिकेच्या अधिकार्यांना वारंवार कळवूनदेखील ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवासी व नागरिकांनी केला आहे. या रस्त्यावरून आम्ही चालायचे कसे? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड म्हणाले की, या ड्रेनेजलाइनबाबत नागरिकांच्या तक्रार आल्या आहेत. लवकरच या वाहिनीची दुरुस्ती करून नागरिकांची गैरसाय दूर केली जाईल.
पासलकर चौक ते काकडेवस्ती चौक यादरम्यानच्या रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ही समस्या
उद्भवली आहे. महापालिकेने ड्रेनेजलाइनची दुरुस्ती करावी; अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.– अतुल जैन, रहिवासी
पासलकर चौक परिसरातील ड्रेनेजलाइन तुंबल्याचीतक्रार आली आहे. या वाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत संबंधित अधिकार्यांना सूचना केल्या आहेत. पुढील काही दिवसांत या कामासाठी निविदा काढल्या जाणार आहेत.
– संतोष तांदळे, अधीक्षक अभियंता, ड्रेनेज विभाग
हेही वाचा