सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव : सप्तसुरांची उधळण अन् नादमय वादन

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव : सप्तसुरांची उधळण अन् नादमय वादन
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पहिल्यांदाच सादरीकरण करणार्‍या अंकिता जोशी यांची दमदार गायकी… पं. पार्था बोस यांच्या सतार वादनाने जिंकलेली मने… पं. उपेंद्र भट यांच्या गायकीने निर्मिलेले स्वरतरंग अन् डॉ. अश्विनी भिडे- देशपांडे यांच्या गायकीने दिलेला स्वरानंद… अशा सुरेल वातावरणात 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा दुसरा दिवस संस्मरणीय ठरला. स्वराविष्काराच्या, वादनाच्या आतषबाजीने रसिक आनंदित झाले अन् दिग्गजांसह युवा कलाकारांनी केलेले सादरीकरण रसिकांसाठी खास ठरले. दुसर्‍या दिवशीही महोत्सवात रसिकांची गर्दी झाली होती.

दुसर्‍या दिवशी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या गायनाला रसिकांनी उभे राहून दाद दिली. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित या महोत्सवाचा दुसरा दिवसही सूरमयी ठरला. गायकांच्या सप्तसुरांची उधळण अन् वादकांच्या नादमय वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणार्‍या अंकिता जोशी यांच्या दमदार आणि तयारीच्या सादरीकरणाने दुसर्‍या दिवसाचा पूर्वार्ध गाजला. त्यांनी पहिल्यांदाच महोत्सवाच्या स्वरमंचावर सादरीकरण केले. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग 'मुलतानी'ने केली. 'गोकुल गाव का छोरा' या पारंपरिक रचनेतून आणि त्याला जोडून 'अजब तेरी बात' या बंदिशीतून तसेच 'आये मोरे साजनवा' या द्रुत रचनेतून त्यांनी रागमांडणी साधली.

'दिल की तपिश' ही राग किरवाणीवर आधारित रचना त्यांनी सादर केली. रसिकांनी या रचनेला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. अंकिता यांनी 'नाम गाऊ, नाम ध्यावू, नामे विठोबाला पाहू' या अभंगाने गायनाची सांगता केली. दुसरे सत्र सतारवादक पं. पार्था बोस यांच्या बहारदार सतारवादनाने रंगले. मैहर घराण्याचा वारसा जपणार्‍या पं. पार्था यांनी वादनासाठी राग मारवा निवडला होता. आलाप, जोड, झाला या क्रमाने त्यांचे वादन रंगत गेले. राग खमाजमधील गतमाला (एकाच तालात विविध बंदिशी) सादर करून त्यांनी वादनाची सांगता केली. त्यांना पं. रामदास पळसुले यांनी तबल्यावर अप्रतिम साथ केली.

त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य आणि किराणा घराण्याचे गायक पं. उपेंद्र भट यांचे गायन झाले. त्यांनी राग शुद्धकल्याणमध्ये विलंबित एकतालात 'तुमबिन कौन' ही रचना आणि 'रस भिनी भिनी' ही बंदिश सादर केली. पं. भीमसेन जोशी तसेच पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता झाल्यानिमित्त त्यांना अभिवादन म्हणून त्यांनी 'इंद्रायणी काठी' ही गाजलेली भक्तिरचना सादर केली.
डॉ. अश्विनी भिडे – देशपांडे यांच्या सुरेल गायनाने 'सवाई'च्या दुसर्‍या दिवसाचा उत्तरार्ध स्मरणीय झाला. जयपूर अत्रौली घराण्याचा वारसा समर्थपणे चालवणार्‍या डॉ. अश्विनी भिडे – देशपांडे यांनी सुरवातीला राग काफी कानडा मांडला. विलंबित त्रितालातील 'लायी रे मदपिया' ही पारंपरिक बंदिश आणि त्याला जोडून हवेली संगीतातील 'कान्हकुवर के करपल्लव पर मानो गोवर्धन नृत्य करे' ही रचना द्रुत त्रितालात त्यांनी सादर केली. अतिशय शांत पद्धतीने रागविस्तार हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य होते.

महोत्सवातील आजचे सादरीकरण
(शुक्रवार, 15 डिसेंबर)

  • रजत कुलकर्णी (गायन)
  • पद्मा देशपांडे (गायन)
  • नीलाद्री कुमार (सतारवादन)
  • पं. अजय पोहनकर (गायन)
  • सहभाग – अभिजित पोहनकर

हा स्वरमंच माझ्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. माझे गुरू संगीतमार्तंड
पं. जसराजजी यांना प्रथम भेटण्याचे भाग्य मला इथेच लाभले, त्यामुळे या स्वरमंचाशी माझे विशेष नाते आहे. येथे गायन करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे.

– अंकिता जोशी, गायिका

मला इथे येण्याचा खूप आनंद झाला आहे. मी बंगाली आहे, पण संगीत ही हृदयाची भाषा आहे. या महोत्सवाचे नाव इतके मोठे आहे, की माझ्यासाठी हे केवळ संगीत संमेलन नाही, तर हा सिद्ध मंच आहे, हे तीर्थ आहे.

– पं. पार्था बोस, सतारवादक

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news