‘पालकांच्या गोष्टीं’चा विक्रम; भारताने चीनचे रेकॉर्ड मोडले | पुढारी

‘पालकांच्या गोष्टीं’चा विक्रम; भारताने चीनचे रेकॉर्ड मोडले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हजारो पालकांनी एकत्र येऊन केलेले गोष्टींचे वाचन… गोष्टींच्या जगात रमलेली मुले अन् या गोष्टी सांगण्याच्या प्रयोगाने झालेला विश्वविक्रम… असे उत्साही वातावरण स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी पाहायला मिळाले. पालकांनी एकत्र येऊन मुलांना गोष्टी सांगितल्या अन् या आगळ्यावेगळ्या प्रयोगाची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये झाली. पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगण्याचा चीनचा रेकॉर्ड मोडत भारताने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारपासून (दि. 16) पुणे पुस्तक महोत्सव आयोजिला आहे. यानिमित्ताने पुणे महापालिकेच्या वतीने आयोजिलेल्या ‘पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या’ या उपक्रमात तीन हजारहून अधिक पालकांनी सहभागी होत आपल्या मुलांना सलग चार मिनिटे गोष्ट सांगितली. सहभागी पालकांनी क्षिप्रा शहाणे यांनी लिहिलेल्या ‘निसर्गाचा नाश करू नका’ या पुस्तकातील गोष्टीचे वाचन केले. या वेळी ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’च्या अधिकार्‍यांनी ‘पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या’ हा नवा विश्वविक्रम भारताच्या नावाने प्रस्थापित केल्याचे जाहीर केले आणि त्यानंतर मैदानावर एकच जल्लोष झाला.

ढोल- ताशांच्या गजरात आणि देशभक्तिपर गीतांवर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमात सुमारे तीन हजार 200 पेक्षा अधिक पालक आणि मुलांनी सहभाग नोंदवला. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, अ‍ॅड. एस. के. जैन, उद्योजक कृष्णकुमार गोयल, न्यासाचे संचालक युवराज मलिक, अभिनेत्री प्राजक्ता माळी, संयोजक राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते. प्राजक्ता माळी यांनी उपस्थित मुलांशी संवाद साधत त्यांना ‘रोज भरपूर पुस्तके वाचा’, असा सल्ला दिला. या वेळी चैतन्य कुलकर्णी यांनी मराठी गीतांच्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

तीन हजार 66 पालक एकत्र

पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या हा विश्वविक्रम यापूर्वी चीनच्या नावावर होता. चीनमध्ये साधारण आठ वर्षांपूर्वी दोन हजार 479 पालकांनी एकाचवेळी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगितल्या. त्यानंतर स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर तीन हजार 66 पालकांनी एकत्रित येत, आपल्या मुलांना गोष्टी सांगितल्या आणि विश्वविक्रमाला गवसणी घातली.

टिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी

महापालिकेच्या वतीने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगण्याचा हा उपक्रम, तर सारसबागेत बालोत्सव आयोजित केला होता. बालोत्सवासाठी शालेय विद्यार्थ्यांना पीएमपी बसमध्ये सारसबागेत आणण्यात आले. या पीएमपी बसेस रस्त्यावर उभ्या असल्यामुळे सारसबाग परिसरासह टिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.

हेही वाचा

Back to top button