

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बी.कॉम.च्या बनावट पदवीप्रकरणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती यांसह अन्य संघटनांनी आंदोलन करत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला तसेच संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
आंदोलनादरम्यान नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया अर्थात एनएसयूआच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत भ्रष्टाचाराचा निषेध नोंदविला. कथीत पदवी विक्री प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी खोट्या नोटांची उधळण करून प्रतिकात्मक आंदोलन केले. "पैशांच्या जोरावर पदव्या विकल्या जात असतील, तर ही केवळ पदवी विक्री नसून, विद्यापीठाच्या प्रतिष्ठेची विक्री आहे, असा संताप व्यक्त केला.
या आंदोलनाद्वारे एनएसयूआयने काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये पदवी प्रकरणातील सर्व दोषींवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या प्रकरणाची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून प्रभारी कुलसचिवांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. या कथीत प्रकरणातील मुख्य कर्मचारी वित्त व लेखा विभागाशी संबंधित असल्याने वित्त व लेखा विभागाच्या प्रमुखांचा देखील तत्काळ राजीनामा घेण्यात यावा, तसेच त्यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.
प्रशासनाने या प्रकरणात दोषींवर तत्काळ कारवाई करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही केली नाही, तर विद्यार्थीहितासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे देखील स्पष्ट करण्यात आले. या आंदोलनात पुणे जिल्हा व पुणे शहर अध्यक्ष अभिजित गोरे, उपाध्यक्ष सिद्धांत जांभुळकर, महासचिव विकास अवचार यांच्यासह अन्य उपस्थित होते.
प्रवेश,परीक्षा व निकाल यांना बाधित करणाऱ्या व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला मारक असलेल्या प्रत्येक गोष्टी विद्यापीठामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून घडत असल्याचा चित्र दिसत आहे. एका बाजूला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र अतिशय ढिसाळ स्वरूपाचा कारभार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वारंवार समोर येत आहे. प्रशासनातील अकार्यक्षमतेमुळे गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांच्या पदव्या अशा पद्धतीने विकल्या जात असतील तर संपूर्ण शिक्षण पद्धती व शैक्षणिक गुणवत्तेला हे हानिकारक आहे, असे मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात अभाविपचे पुणे महानगर मंत्री राधेय बाहेगव्हानकर यांनी व्यक्त केले.
विद्यापीठामध्ये बी.कॉम. च्या कथीत बनावट पदवी प्रकरणाचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणामुळे विद्यापीठाच्या विश्वासार्हतेवर आणि उच्च शिक्षण व्यवस्थेच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गैरप्रकारात सहभागी असलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच इतर संबंधित व्यक्तींवर तत्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने केली आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्तींवर पुढील आठवड्यापर्यंत ठोस आणि दृश्यमान कारवाई न झाल्यास, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती संविधानिक व लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा समितीने दिला आहे.
मास्टरमाईंड कोण?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वित्त व लेखा विभागातील अधिकारी रमेश दामोदर मुखेकर यांनी ७० हजार रुपये घेऊन बी.कॉम.ची बनावट डिग्री दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने मुखेकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यामुळे त्यांच्यासह या प्रकारात अन्य कोण सहभागी होते, परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांचा यात सहभाग आहे का, यापूर्वी त्यांनी अशा किती विद्यार्थ्यांना बोगस पदव्या दिल्या, यासह अन्य माहिती पोलिस चौकशीत उघड होईल. यातूनच या बनावट डिग्रीचा मास्टरमाईंड नेमका कोण हे स्पष्ट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विद्यापीठात बनावट पदवी देण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी तत्काळ सत्यशोधन समितीची स्थापना केली. या समितीने मंगळवारी आणि बुधवारी संबंधित प्रकरणाची कसून चौकशी करून अहवाल तयार केला आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांच्याकडे दिला. त्यानंतर संबंधित अधिकारी आणि डॉ. तलवारे यांनी पोलिसांत तक्रार देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पोलिस चौकशीत आता या प्रकरणाचे धागेदोरे उघड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यासंदर्भात विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाचे कर्मचारी रमेश दामोदर मुखेकर (वित्त व लेखा विभाग) यांनी साहिल महेश कदम या विद्यार्थ्यास विद्यापीठाच्या बी.कॉम. या अभ्यासक्रमाचे गुणपत्रक तसेच पदवी प्रमाणपत्र मिळवून देतो, असे सांगून त्याच्याकडून ७० हजार रुपये गुगल पेद्वारे स्वीकारून व्हॉट्सॲपवर संगणकाद्वारे तयार केलेल्या मूळ कागदपत्रांसारख्या भासणाऱ्या इमेजेस दिल्या, अशा आशयाची तक्रार विद्यापीठास प्राप्त झाली आहे. संबंधित कर्मचारी हा विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कार्यरत नाही तसेच त्याने व्हॉट्सॲपवर तयार करून दिलेली कागदपत्रे परीक्षा विभागाच्या अभिलेखांशी सुसंगत नाहीत, असे निदर्शनास आले. तसेच मुखेकरने पैसे स्वीकारून संबंधित गैरकृत्यात सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुखेकरला तत्काळ प्रभावाने विद्यापीठ सेवेतून निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणाची व्याप्ती विचारात घेता सखोल तपासाच्या दृष्टीने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी तक्रार दिली आहे.
दोषींवर कठोर कारवाई करणार
बनावट डिग्री दिल्याप्रकरणी पोलिस तपासात ज्यांचा ज्यांचा सहभाग आढळून येईल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. संबंधित गैरप्रकार मुखेकर यांनी परीक्षा विभागाशी संबंधित नसतांना तसेच परीक्षा विभागाच्या व्यवस्थेबाबतचे त्यांचे ज्ञान वापरून केला असल्याचे निदर्शनास आलेले असून, यात व्यवस्थागत इतर कोणाचा सहभाग आहे का, ही बाब पोलिस तपासात स्पष्ट होईल. विद्यापीठाकडून देण्यात येणाऱ्या परीक्षेच्या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रांमध्ये उच्च दर्जाच्या सुरक्षा मानकांचा समावेश असल्यामुळे यासंदर्भातील अफवांवर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.