

नारायणगाव: विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे नोंदवावा. गाळप हंगामात कारखान्यालाच प्राधान्याने ऊस द्यावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केले आहे.
कारखान्यामार्फत मोफत माती परीक्षण करून दिले जाते. चालू लागवड हंगामापासून विघ्नहर कृषी अमृत हे सेंद्रीय खत 50 किलो बॅग पॅकिंगमध्ये माफक दरात उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती शेरकर यांनी दिली. (Latest Pune News)
कारखान्यामार्फत लागवड हंगाम 2003-04 पासून हुमणी किडीचा प्रादुर्भाव टाळणेसाठी शेतकरी व मजुरांकडून रोख रक्कम प्रतिकिलो 200 रुपये देऊन हुमणी किडीचे भुंगेरे गोळा करून कारखाना गट ऑफिसला जमा करून कारखाना साईटवर नष्ट केले जातात.
सर्व ऊस उत्पादक शेतकर्यांनी लागवड हंगाम 2025-26 मध्ये 26 मे ते 30 जून 2025 या कालावधीत हुमणी किडीचे भुंगेरे गोळा करून कारखाना गट ऑफिसला जमा करावेत, असे आवाहन शेरकर यांनी केले आहे
शेतकर्यांना ऊस पिकातील नवनवीन संशोधित तंत्रज्ञान व ऊस पिकामध्ये यांत्रिकीकरणाच्या वापराची माहिती होणेसाठी कारखाना खर्चाने व्हीएसआय आयोजित ज्ञानयाग व ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पाठविले जाते.
तसेच ऊस उत्पादक शेतकर्यांमध्ये एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणेची भावना वृध्दींगत होणेसाठी एकरी 100 ते 110 टन ऊस उत्पादन घेणारे शेतकरी तसेच एकरी 111 व त्यापुढे ऊस उत्पादन घेणार्या शेतकर्यांना प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविणेत येते. व्हीएसआयमार्फत देण्यात येणार्या ऊसभूषण पुरस्कारासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्यांचा सहभाग नोंदविण्यात येतो. आजवर कारखान्याच्या 5 ऊस उत्पादक शेतकर्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत.