

पुणे : राज्याचे कृषिमंत्री यांच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. या विषयावर मला काहीही बोलायचे नाही अन् त्यावर विचारूही नका, असे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले. फिक्की महिला आघाडीच्या कार्यक्रमासाठी राणे पुण्यात आले असता पत्रकारांनी त्यांना घेरले.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले, राहुल गांधी यांची यात्रा ही भारत जोडो यात्रा नसून, काँग्रेस तोडो यात्रा म्हणावी लागेल. कारण, ते जिथे जिथे जातात, तेथील लोक दुसरीकडे जात आहेत. म्हणजेच, त्यांचा पायगुण चांगला नाही, असे दिसते, अशी टीकाही राणे यांनी केली.
उद्योगासाठी पोषक वातावरण
महाराष्ट्रात नवीन उद्योग येण्यासाठी उत्सुक असून, अनेक उद्योजक वेटिंगवर आहेत. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात उद्योगासाठी पोषक वातावरण नव्हते. नवीन उद्योगांसाठी आता योग्य वेळ व वातावरण झाल्यानेच मोठे उद्योग येतील. नोटाबंदीचा परिणाम उद्योगांवर झाला नसून, आता उद्योग महाराष्ट्रात येण्यासाठी तयार आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारने पुरवली थेट मदत
ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही नियम असतात. ते नियम पूर्ण होत असले, तरी शिंदे-फडणवीस सरकारने गंभीर स्थिती पाहता शेतकर्यांना थेट मदत पुरवली. याउलट उद्धव ठाकरे सरकारच्या काळात निसर्गाचा मोठा कोप झाला होता. असे असतानाही त्यांनी मदत दिली नाही. गंभीर स्थिती असतानाही उद्धव ठाकरे केवळ 26 मिनिटे शेतकर्यांच्या बांधावर गेले होते. त्यावेळी त्यांनी मदत का दिली नाही, असा सवालही राणे यांनी केला.