

पारगाव; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बटाटा पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या बटाटा पीक फुलोर्यात आले आहे. आता पाऊस थांबून बटाट्यावरील संकट दूर झाल्याने बटाटा उत्पादक शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
बटाटा पिकाचे आगार म्हणून आंबेगाव तालुक्याचा पूर्व भागाला ओळखले जाते. थोरांदळे, नागापूर, रांजणी आदी परिसरात बटाटा पीक सर्वाधिक क्षेत्रात घेतले जाते.
यंदा देखील सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकर्यांनी बटाटा बेण्याचे भाव अधिक असताना लागवडी मोठ्या धाडसाने केल्या. परंतु, लागवडीनंतर पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. अनेक शेतकर्यांच्या बटाटा पिकात पावसाचे पाणी साचून राहिले. त्यामुळे जमिनीतील बटाटा रोपांची मुळे सडून गेली. यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, आता पावसाने विश्रांती घेतली आहे. वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. सध्याचे वातावरण बटाटा पिकासाठी अतिशय पोषक आहे. सध्या बटाटा पीक फुलोर्यात आले आहे. अतिपावसाचे संकट दीर्घकाळानंतर दूर झाल्याने बटाटा उत्पादक शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
उत्पादन घटणार हे नक्की
यंदा अतिपावसाचा फटका बटाटा पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेक शेतकर्यांच्या बटाटा पिकात पावसाचे पाणी अनेक दिवस साचून राहिले होते. त्यामुळे पीक सडून गेले. यामुळे यंदा बटाट्याच्या गळितावर परिणाम होऊन उत्पादन घटणार असल्याचे बटाटा उत्पादक शेतकरी सांगत आहेत.